---Advertisement---

आजच्याच दिवशी कर्टली ऍम्ब्रोज यांनी केली होती ‘न‌ भूतो न भविष्यती’ कामगिरी

On: रविवार, जानेवारी 30, 2022 10:00 AM
Curtly-Ambrose
---Advertisement---

खेळ कोणताही असो त्या खेळाच्या मैदानावर एखादी अशी घटना घडते जी भविष्यात कधी घडलेली नसते किंवा घडण्याची शक्यता अत्यंत कमी असते. क्रिकेटमध्ये अशा ‘न भूतो न भविष्यती’ घटना काही विशिष्ट वेळीच घडल्या आहेत. ज्या वेळी अशा घटना घडतात तेव्हा त्या घटनेचे किस्से पुढे बऱ्याच काळापर्यंत अगदी अभिमानाने सांगितले जातात.

३० जानेवारी १९९३ या दिवशी ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर अशीच एक घटना घडली होती. दर्दी क्रिकेटप्रेमींना ही तारीख अगदी रोमांचित करते. कारण, वेस्ट इंडीजचे दिग्गज वेगवान गोलंदाज कर्टली ऍम्ब्रोज यांनी या दिवशी इतिहास घडवला होता. असा इतिहास जो, पुसला जाण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.

रोमांचक अवस्थेत होती कसोटी मालिका

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आलेला तगडा वेस्ट इंडीज संघ ऑस्ट्रेलियाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत चांगली टक्कर देत होता. ऑस्ट्रेलिया मायदेशात मजबूत संघ असला तरी, वेस्ट इंडीजच्या अनुभवी वेगवान गोलंदाजांनी त्यांच्या नाकीनऊ आणले होते. पहिल्या चार कसोटीपैकी दोन्ही संघांनी  एक-एक कसोटी जिंकत मालिकेची उत्कंठा अखेरच्या पर्थ कसोटीपर्यंत ताणलेली. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभुत करण्याची नामी संधी वेस्ट इंडीजकडे होती आणि ती साधण्याचा प्रयत्न वेस्ट इंडिजचा संघ करणार होता.

पाचवी निर्णायक कसोटी

ऑस्ट्रेलियाचे कर्णधार ऍलन बॉर्डर व वेस्ट इंडीजचे कर्णधार रिची रिचर्डसन नाणेफेकीसाठी वाकाच्या मैदानावर उतरले. यजमान कर्णधार बॉर्डर यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आपली पहिली मालिका खेळणारा सलामीवीर जस्टिन लैंगर व अनुभवी डेव्हिड बून यांनी पहिल्या तासभर वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. मात्र, इयान बिशप यांनी ठराविक अंतरात लैंगर व स्टीव वॉ यांना बाद करत अॉस्ट्रेलियाची अवस्था २ बाद ५८ केली.

कर्टली ऍम्ब्रोज यांचा ऐतिहासिक स्पेल

पहिल्या दिवसाच्या दुसर्‍या सत्रात मार्क वॉ व बून यांनी थोडाफार संघर्ष केला. परंतु, त्यानंतर इतिहास घडायला सुरुवात झाली. आपला तिसरा स्पेल टाकण्यासाठी आलेल्या ऍम्ब्रोज यांनी वॉला यष्टीरक्षक मरे यांच्याकडे झेल देण्यास भाग पाडले. वैयक्तिक ४४ धावांवर फलंदाजी करत असलेल्या बून यांना कर्णधार रिचर्डसन यांच्या हाती झेल द्यायला लावत, ऍम्ब्रोज यांनी आपला दुसरा बळी मिळविला.

चार गडी बाद झाले असताना कर्णधार बॉर्डर मैदानात उतरले. मात्र, ऍम्ब्रोज यांनी पहिला चेंडू तिखट बाउन्सर टाकत मरे यांच्या हाती झेल द्यायला लावून ऑस्ट्रेलियावर सर्वात मोठा आघात केला. बॉर्डर पाठोपाठ आलेले यष्टीरक्षक इयान हिली आणि मर्व ह्यूज हे भोपळाही फोडू शकले नाही. अगदी काही मिनिटात ऑस्ट्रेलियन डावाला सुरुंग लागला होता. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला डेमियन मार्टिन दुसऱ्या टोकावरून हताश होऊन हे सर्व पाहत होता. अखेरीस ऍम्ब्रोज यांनी त्याला ही बाद करत आपला सातवा बळी मिळवला. चांगल्या सुरुवातीनंतरही ऑस्ट्रेलियाचा डाव २ बाद ८५ धावांवरून ११९ धावांवर गडगडला.

वेस्ट इंडीजने घातली मालिका खिशात

वेस्ट इंडीजने आपल्या पहिल्या डावात फिल सिमन्स व किथ आर्तुरटन यांच्या योगदानामुळे ३२२ धावांची मजल मारली. २०३ धावांची पिछाडी ऑस्ट्रेलियासाठी हिमालयासारखी झाली. दुसऱ्या डावात इयान बिशप यांनी ६ बळी मिळवून ऑस्ट्रेलियाचा १७८ धावांमध्ये खुर्दा उडविला. वेस्ट इंडीजने एक डाव व २५ धावांनी तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचे पानिपत केले आणि एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.

कर्टली ऍम्ब्रोज यांनी आपल्या त्या ‘अविश्वसनीय’ स्पेलमध्ये ३२ चेंडू टाकत अवघी एक धाव देऊन ७ कांगारू फलंदाजांची शिकार केली होती. त्या डावातील त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण १८ षटके, ९ निर्धाव षटके, २५ धावा व ७ बळी. त्या एकाच डावात नव्हे तर संपूर्ण मालिकेत ३३ बळी मिळवून वर्चस्व गाजवणाऱ्या ऍम्ब्रोज यांना मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. संपूर्ण क्रिकेटजगत ऍम्ब्रोज यांच्या नावाचा उदो-उदो करत होते. ऍम्ब्रोज यांच्याकडून थक्क करणारी कामगिरी झाल्याने ‘जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज’ असे म्हणण्यात अतिशयोक्ती वाटत नव्हती.

महत्वाच्या बातम्या:

‘हरियाणा हरिकेन’ कपिल देव यांनी आजच्याच दिवशी केला होता कसोटीतील ‘मोठा’ विश्वविक्रम

कोरोना नियमांचे पालन करून टेनिस स्पर्धेचे आयोजन- अजितदादा पवार

‘आठव्या क्रमांकावर फलंदाजी थोडी लवकर होईल, मला ११ नंबरला ठेवा’; जडेजाचे ट्वीट का आहे चर्चेत?

हेही पाहा-

काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये । World Cup Semi Final 2019

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---