वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला सामना गुरुवारी (दि. 05 ऑक्टोबर) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने शानदार 9 विकेट्सने विजय मिळवला. आता विश्वचषकातील दुसरा सामना शुक्रवारी (दि. 06 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड संघात खेळला जाणार आहे. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याविषयी आपण सर्वकाही जाणून घेऊयात…
खरं तर, पाकिस्तान संघाने स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी पहिले दोन्ही सराव सामने गमावले होते. तसेच, नेदरलँडच्या दोन्ही सराव सामन्यावर पावसाने पाणी फेरले होते. अशात बाबर आझम (Babar Azam) याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ (Pakistan Team) विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल, तर नेदरलँड (Netherlands) संघही मोठा उलटफेर करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
पाकिस्तान आणि नेदरलँड्स संघात विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 2 सामने खेळले गेले आहेत. त्या दोन्ही सामन्यात पाकिस्तान संघ विजयी झाला आहे. विश्वचषक 1996मध्ये पाकिस्तान संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर 2003च्या विश्वचषकात पाकिस्तानने नेदरलँडला एकतर्फी 97 धावांनी पराभूत केले होते. तसेच, वनडे क्रिकेटविषयी बोलायचं झालं, तर पाकिस्तान संघाने नेदरलँडला सर्व 6 सामन्यात पराभवाचं पाणी पाजलं आहे.
खेळपट्टी आणि हवामान
हैदराबाद येथील हवामानाविषयी बोलायचं झालं, तर रिपोर्ट्सनुसार, हवामान स्वच्छ असणार आहे. सराव सामन्यात या मैदानावर 300हून अधिक धावा बनल्या होत्या. त्यामुळे फलंदाजांना या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पाडण्याची संधी असेल. मात्र, सायंकाळी फ्लडलाईट्समुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते.
सामन्याचे थेट प्रक्षेपण
भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. तसेच, नाणेफेक 1.30 वाजता होईल. हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. तसेच, डिझ्नी प्लस हॉटस्टार ऍपवर सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग होईल.
विश्वचषकासाठी उभय संघ
पाकिस्तान
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.
नेदरलँड्स
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच. (cwc 2023 pak vs ned 2nd match preview weather and live stream know here)
हेही वाचा-
सचिन-द्रविड सोबत रचिन रंविंद्रचं स्पेशल कनेक्शन! सामनावीर ठरल्यानंतर म्हटला, ‘मी नशीबवान कारण…’
कॉनवेच्या दीडशतकाने वाढले भारतीयांचे टेन्शन! नरेंद्र मोदी स्टेडियमवर घडला नकोसा योगायोग