विश्वचषक 2023 स्पर्धा गाजवत असलेल्या संघांमध्ये न्यूझीलंडचाही समावेश आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन केले आहे. शुक्रवारी (दि. 13 ऑक्टोबर) चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश संघ आमने-सामने होते. हा एकतर्फी सामना न्यूझीलंडने 43 चेंडू शिल्लक ठेवून 8 विकेट्सने जिंकला. हा केन विलियम्सन याच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा विश्वचषकातील सलग तिसरा विजय ठरला. तसेच, ते विश्वचषक 2023 स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झाले. या विजयानंतर विलियम्सनने मोठी प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर काय म्हणाला विलियम्सन?
या सामन्यानंतर केन विलियम्सन (Kane Williamson) याने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “अंगठ्याला सूज आली आहे आणि उद्या स्कॅन करेल. आशा आहे की, हे ठीक होईल. माझा गुडघा ठीक आहे. गुडघ्यामुळे हे चांगलं झालं की, मला सामना खेळता आला आणि संघासाठीही चांगले ठरले. माझ्या मते, आमच्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “खेळपट्टीत उसळी होती. आमच्या गोलंदाजांनी खेळपट्टीवर खूपच चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर आम्ही भागीदारी करण्यावर लक्ष देऊन सामना जिंकला. पॉवरप्लेदरम्यान आम्हाला जाणवले की, खेळपट्टीवर जोरात गोलंदाजी करायची आहे. ही खेळपट्टी खराब नव्हती, तर खूपच चांगली प्रतिस्पर्धी खेळपट्टी होती.”
गोलंदाजांचे कौतुक करताना विलियम्सन म्हणाला, “लॉकी फर्ग्युसनने चांगले प्रदर्शन केले. तुम्ही इथे या आशेने आला होता की, फिरकीपटू शानदार प्रदर्शन करतील, पण वेगवान गोलंदाजांनी आज शानदार प्रदर्शन केले. लॉकी फक्त धावत आला, वेगाने गोलंदाजी केली आणि अनेक ठिकाणी त्याला नशिबाची चांगली साथ मिळाली नाही. मात्र, तो शानदार प्रदर्शनाचा हक्कदार आहे.” फर्ग्युसनने 10 षटके गोलंदाजी करताना 49 धावा खर्चून 3 विकेट्स नावावर केल्या.
याव्यतिरिक्त 67 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांचा पाऊस पाडून 89 धावांची विजयी खेळी साकारणाऱ्या डॅरिल मिचेल याचेही त्याने कौतुक केले. तो म्हणाला, “मिचेल खूप चांगला प्रतिस्पर्धी खेळाडू आहे. त्याने मौल्यवान योगदान दिले. तो संघाचा प्रमुख खेळाडू आहे आणि त्याला फलंदाजी करताना पाहताना आनंद होतो.”
सामन्याचा आढावा
खरं तर, या सामन्यात बांगलादेश संघ प्रथम फलंदाजीला उतरला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 245 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 42.5 षटकात 2 विकेट्स गमावत 248 धावा करून सामना खिशात घातला.
या सामन्यातील केन विलियम्सन याच्या खेळीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 107 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. तो रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानातून बाहेर जावे लागले. (cwc 2023 skipper kane williamson praises lockie ferguson daryl mitchell after defeating bangladesh)
हेही वाचा-
सचिनचा रेकॅार्ड मोडायची विराटला करियरमधली शेवटची संधी? पाहा काय आहे रेकॅार्ड!
अहमदाबादमध्ये ‘या’ 5 भारतीयांनी ठोकल्यात सर्वाधिक धावा, 3 झालेत निवृत्त, तर दोघे पाकिस्तानविरुद्ध भिडणार