भारतीय संघाचा जलवा विश्वचषक 2023 स्पर्धेत कायम आहे. गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) भारताने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या सातव्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय संघ सर्व विभागात चमकला. आधी फलंदाजांनी 357 धावांचा भलामोठा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजांनी या आव्हानाचा यशस्वी बचाव केला. तसेच, श्रीलंकेला अवघ्या 55 धावांवर लोटांगण घालण्यास भाग पाडले. असे असले, तरीही विराट कोहली याने चालू सामन्यात मैफील लुटली. त्याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 357 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा एकही फलंदाज टिकू शकला नाही. त्यांना अवघ्या 55 धावांवर गुडघे टेकावे लागले. त्यामुळे हा सामना भारताने 302 धावांनी जिंकला. या सामन्यात विराट कोहली याची बॅटही चमकली. तो शतक करण्यास चुकला. त्याने 94 चेंडूत 88 धावांचे योगदान दिले. यामध्ये 11 चौकारांचा समावेश होता. शतक जरी हुकले असले, तरीही त्याने चाहत्यांचे मनोरंजन करण्याची संधी सोडली नाही.
Virat Kohli dancing on 'MY NAME IS LAKHAN' 🤩 #INDvSL pic.twitter.com/28Uzadj50D
— Sameer Allana (@HitmanCricket) November 2, 2023
विराट कोहलीचा डान्स
विराटने श्रीलंकेच्या डावात क्षेत्ररक्षणादरम्यान चाहत्यांनी गाणे म्हणताच ठुमके लावले. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, श्रीलंकेच्या डावादरम्यान जेव्हा विराट क्षेत्ररक्षण करत असतो, तेव्हा बॉलिवूडचे प्रसिद्ध गाणे ‘माय नेम इज लखन’ (My Name Is Lakhan) गाणे वाजत असते. हे गाणे चाहते गाताना दिसतात, ज्यानंतर विराट जेव्हा हे गाणे ऐकतो, तेव्हा तो स्वत:ला डान्स करण्यापासून रोखू शकत नाही आणि तो थिरकतो. विराटने बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) याच्या स्टेप्सही हुबेहूब कॉपी केल्या आहेत. अशात विराटला डान्स करताना पाहून चाहत्यांचाही उत्साह वाढला आणि त्यांना जल्लोष केला. संपूर्ण स्टेडिअममध्ये कोहली-कोहलीच्या नावाचा जयघोष सुरू होता.
Virat Kohli dancing on 'My Name is Lakkhan'. pic.twitter.com/64595JKNhj
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2023
भारतीय संघ उपांत्य फेरीत
भारताने हा सामना जिंकत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. सामन्याविषयी बोलायचं झालं, तर या सामन्यात भारताला 357 धावांपर्यंतची मजल मारण्यात तीन खेळाडूंचे सर्वात मोठे योगदान होते. त्यात शुबमन गिल (92), विराट कोहली (88) आणि श्रेयस अय्यर (82) यांचा समावेश आहे. भारताच्या डावात गोलंदाजी करताना श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
यानंतर श्रीलंका संघ फलंदाजीला उतरला, तेव्हा त्यांना शंभर धावाही करता आल्या नाहीत. त्यांना 19.4 षटकात 55 धावांवर सर्व विकेट्स गमवाव्या लागल्या. यावेळी भारताकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराज याने 3, तर जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
अशाप्रकारे 302 धावांनी विजय मिळवत भारत पॉईंट्स टेबलमध्येही अव्वलस्थानी पोहोचला. भारताचे 7 सामन्यात 7 विजयासह 14 गुण झाले आहेत. तसेच, नेट रनरेटही वाढला आहे. भारताचा नेट रनरेट +2.102 आहे. (cwc 23 ind vs sl virat kohli dance video viral on social media kohli was seen dancing on my name is lakhan song see video)
हेही वाचा-
शमीने 5 विकेट्स घेत ड्रेसिंग रूमकडे केला इशारा, गिलने केला खुलासा; म्हणाला, ‘तो प्रशिक्षक…’
‘मी पूर्णपणे फिट नाही, डेंग्यूमुळे माझे…’, शतक हुकल्यानंतर शुबमनचा धक्कादायक खुलासा