बर्मिंघम, इंग्लंड येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला क्रिकेट खेळले जात आहे. या स्पर्धेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. भारतीय संघ या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. या सामन्यात तिने अर्धशतकी खेळी करत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर स्म्रीती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी संघाला उत्तम सुरूवात करून दिली. मंधाना १७ चेंडूत २४ धावा करत बाद झाली. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यष्टीरक्षक यस्तिका भाटिया आणि शेफाली यांनी ४३ धावांची भागीदारी रचली. मात्र विकेट्स जात असताना हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीने एक बाजू सांभाळत अप्रतिम फलंदाजी केली आहे.
हरमनप्रीतने ३४ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५२ धावा केल्या आहेत. यामुळे ती एकाच संघाविरुद्ध टी२०मध्ये ५०० धावांचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या या खेळीमुळे भारताने १५० धावांचा आकडा पार केला. तसेच शेफालीने ४८ धावा केल्याने संघाने २० षटकात ८ विकेट्स गमावत १५४ धावासंख्या उभारली आहे.
हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत २३ टी२० सामन्यातील २२ डावांमध्ये खेळताना ५२६ धावा केल्या आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे. तर एकाच संघाविरुद्ध टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंचा यादीत स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ४८९ धावा केल्या आहेत.
एकाच संघाविरुद्ध टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला खेळाडू-
५२६ हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
४८९ स्म्रीती मंधाना विरुद्ध ऑस्ट्रेलिया
४३६ स्म्रीती मंधाना विरुद्ध इंग्लंड
४०९ मिताली राज विरुद्ध इंग्लंड
३९९ मिताली राज विरुद्ध श्रीलंका
हरमनप्रीत आणि वेगवान गोलंदाज रेणूका सिंग यांची मेहनत वाया गेली आहे. भारताने हा सामना ३ विकेट्सने गमावला आहे. तर रेणूकाने ४ षटके टाकताना १८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. भारत पुढील सामना ३१ जुलैला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. तसेच या स्पर्धेतील क्रिकेटचे सर्व सामने एजबस्टन येथेच होणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहच्या जागी ‘या’ २३ वर्षीय गोलंदाजाला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? यापूर्वी गाजवलीये आयपीएल
रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना
हार्दिकसारख्या ऑलराऊंडरचा शोध संपला! २५ वर्षीय खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचं दार