भारताचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये ते प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. गांगुलीसाठी ही जबाबदारी खूप महत्त्वाची मानली जात आहे. याआधी ते आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग युनिटचा भाग राहिलेले आहेत. हेड कोच म्हणून ते जोनाथन ट्रॉट यांच्या जागी काम पाहतील. ट्रॉट गेल्या वर्षापासून प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मूळ कंपनी JSW स्पोर्ट्समध्ये क्रिकेट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
प्रिटोरिया संघाला सौरव गांगुलीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण, माजी कर्णधार पहिल्यांदाच मुख्य प्रशिक्षक झाले आहेत. खेळाडू म्हणून क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर 2015 ते 2019 या काळात ते बंगाल क्रिकेट संघाचे अध्यक्ष होते. त्यानंतर आयपीएल 2019 मध्ये ते दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये मेंटर म्हणून सहभागी झाले. लगेचच त्यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यामुळे त्यांनी दिल्ली कॅपिटल्ससोबतचा कार्यकाळ सोडला.
सौरव गांगुली यांनी भारतासाठी 113 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्यांनी 42.17 च्या उत्तम सरासरीने 7212 धावा केल्या आहेत. याशिवाय 311 एकदिवसीय सामन्यांत त्यांनी 41.02 च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी कसोटीत 16 शतके आणि एकदिवसीय सामन्यांत 22 शतके झळकावली आहेत.






