पुणे । जागतिक शालेय बॅडमिंटन स्पर्धेनिमित्त पुण्यात आलेल्या १६ देशांच्या संघानी पुण्यातील विविध स्थळांना भेटी देत शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेतले.
यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराला भेट देत तिथे बाप्पांची आरती देखील बॅडमिंटनपटूंनी केली.
यावेळी स्पर्धेच्या निरीक्षक फ्रान्सच्या लितीशिया पिकार्ड, नॉरबर्ट केव्हर,ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सुर्यंवंशी, सुनील रासने, स्पर्धा संयोजन समितीतील सुभाष रेवतकर, शिवाजी कोळी, सुहास पाटील, चंद्रशेखर साखरे, विद्या शिरस, सुहास व्हनमाने, संदीप ढाकणे, श्रीकांत हरनाळे, चनबस स्वामी, वैशाली दरोडे, मालती पोटे यावेळी उपस्थित होते.
दिनांक २० एप्रिलपासून जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी तुर्की, युएई, क्रोएशिया, बेल्जियम, बल्गेरीया, ब्राझील, चायनीज तैपई, फ्रान्स, चीन, इंग्लड, ग्रीस, झेक रिपब्लिक, जॉर्जिया, इटली आणि भारताच्या संघांनी पुण्याची सफर केली.
संघानी पुण्याची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती जाणून घेत पुण्याची सफर केली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत त्यांनी कात्रज आंबेगाव येथील शिवसृष्टीला भेट दिली.
त्यांनंतर पुण्याचे आकर्षण असलेल्या शनिवारवाड्याला त्यांनी भेट दिली. यावेळी पेशव्यांचा पराक्रम त्यांनी जाणून घेतला. पुणे सफरीनंतर तुळशीबागेत खरेदीचा मनसोक्त आनंद देखील बॅडमिंटनपटूंनी लुटला.