मराठी मातीतील खेळ म्हणून ओळखला जाणारा दहीहंडी हा खेळ आता ग्लोबल होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात. मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
दरवर्षी केवळ श्रीकृष्ण जन्माष्टमीवेळी दहीहंडीचे आयोजन केले जाते. पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबई व ठाणे परिसरात मोठ्या संख्येने गोविंदा पथके आहेत. जवळपास ५००० पेक्षा जास्त तरुण-तरुणी दरवर्षी दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतात. या सर्वांना खुश करणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळाने घेतला आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन त्याची प्रो कबड्डी व खो-खो प्रमाणे लीग आयोजित करण्याचा सरकारचा मानस आहे. यामुळे दहीहंडी संपूर्ण वर्षभर खेळली जाऊ शकते. नुकतेच सरकारने दहीहंडी दरम्यान सहभागी होणाऱ्या गोविंदांना १० लाखांचे विमा कवच देण्याची घोषणा केली होती.
महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी माहिती देताना सांगितले की,
“दहीहंडीला राज्य खेळांमध्ये दर्जा देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. १८ ऑगस्ट रोजी अधिवेशनात यासंबंधीचे परिपत्रक काढण्यात येईल. राज्याच्या क्रीडा विभागाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत क्रीडा धोरणाविषयी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत.”
मागील अनेक वर्षांपासून दहीहंडीचा साहसी खेळांमध्ये समावेश करण्यात यावा म्हणून प्रयत्न करणारे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले,
“या निर्णयाची लोक मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण, दहीहंडीचा समावेश खेळांमध्ये झाला तर, गोविंदा वर्षभर सराव करू शकतील. तसेच त्यामुळे दुखापतींचे प्रमाणही कमी होईल. शाळा कॉलेजमध्ये दहीहंडीचा समावेश करण्यात यावा यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
दहीहंडी खेळाला पश्चिम महाराष्ट्र व मुंबई परिसरात लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. तसेच स्पेनमधील कॅसलर्स हे गोविंदाशी साधर्म्य असलेले खेळाडू देखील तशाच पद्धतीचे थर लावून आपले प्रात्यक्षिक दरवर्षी सादर करत असतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
झिम्बाब्वेमध्ये इशान किशनला भेटला भारतीय फॅन! म्हणाला, ‘मी पटनाचा…’
अनुभवी संघांना पछाडत नवख्या जर्सीने मारली बाजी! वर्ल्डकप क्वालिफायर्सचे तिकीट केले बुक
विंडीजच्या ‘या’ खेळाडूने संघासाठी एक नव्हे तर दोन विश्वचषक जिंकण्याची इच्छा केली व्यक्त