क्रिकेटमध्ये आजकाल शारिरिक तंदुरुस्तीबरोबरच आता मानसिक तंदुरुस्तीकडेही गंभीरतेने पाहिले जाते. त्याचमुळे खेळाडू मानसिक स्वास्थ्याबद्दलही जागरुक झाले आहेत. त्यातच खेळाडूंना सातत्याने बायोबबलमध्ये राहावे लागत असल्याने मानसिक संतुलन राखणे आव्हानात्मक ठरत आहे, याबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी यापूर्वी भाष्य केले आहे. आता असे समोर येत आहे की ऑस्ट्रेलियाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅनियल सॅम्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाच्या अगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची निवड करण्यात येऊ नये अशी विनंती त्याने स्वत:च क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली होती. त्याने हा निर्णय घेण्यामागे बायोबबलमध्ये सातत्याने राहिल्याने मानसिक ताण वाढल्याचे कारण असल्याचे म्हटले जात आहे.
इएसपीएल क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मानसिक तणावामुळे सॅम्सने वेस्ट इंडिज दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सॅम्स हा मानसिक तणावामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेणारा पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेल, विल पुकोवस्की, निक मॅडिन्सन यांनी याच कारणामुळे क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.
डॅनिएल सॅम्सने केला कोरोनाचा सामना
मागील महिन्यात इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली होती. मात्र, या हंगामापूर्वी काही खेळाडू क्वारंटाईन कालावधीदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यात डॅनिएल सॅम्सचाही समावेश होता. पण त्याने कोरोनावर यशस्वीरित्या मात करत मैदानात पुनरागमन केले होते. त्याने या आयपीएल हंगामात २ सामने खेळले होते. त्यात त्याला १ विकेट घेण्यात यश मिळाले. हा हंगाम २९ सामन्यांनंतर कोरोनाच्या वाढच्या प्रभावाच्या कारणाने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला.
ऑस्ट्रेलिया संघ जाणार वेस्ट इंडिज दौऱ्यावर
जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजविरुद्ध ५ टी२० सामने आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. या मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा झाली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलिया संघ –
ऍरोन फिंच, ऍश्टन एगर, जेसन बेहरेन्डॉर्फ, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मोझेस हेन्रीक्स, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, राइली मेरेडिथ, जोश फिलीप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, तन्विर सिंग, डॉर्सी शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, अँड्रयू टाय, मॅथ्यू वेड, डेविड वाॅर्नर, ऍडम झम्पा.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् मनदीप सिंग उतरला दक्षिण आफ्रिकेकडून क्षेत्ररक्षणासाठी तेही टीम इंडियाविरुद्ध, ‘हे’ होते कारण
इंग्लंड दौर्यावर एकाच विमानाने जाणार भारताचे पुरुष आणि महिला संघ, पण बीसीसीआय करणार ‘हा’ भेदभाव
Video: रॉबिन उथप्पाचे पत्नी शितलसह थिरकले पाय; ऋतुराज गायकवाडने दिले ‘इतके’ गुण






