वेस्ट इंडीजविरूध्द भारताची लढत असायची, तेव्हा एक फलंदाज खेळपट्टीवर पाय रोवून उभा रहायचा. तसा तो सगळ्याच देशांविरुद्ध लढायचा. लढाऊ बाणा त्याच्या रक्ताततच होता.
कसोटी, वनडे सामन्यांमध्ये एकदा का हा फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावला, की पूर्ण सामन्याचे चित्र पालटायचा. त्याचे नाव आहे शिवनारायण चंद्रपॉल.
अनेकांना चंद्रपाॅलबद्दलचा एक खास योगायोग माहित नसेल. कारण तो जरी फलंदाजीने कारनामा खेळाडू असला तरी त्याला ते सतत मीडिया किंवा आताच्या सोशल मीडियावर चर्चत राहणं फारस जमलंच नाही.
तर जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा वानखेडे स्टेडियमवर आपला २००वा कसोटी सामना खेळत होता, तोच सामना चंद्रपाॅलसाठीही विशेष होता. तो चंद्रपाॅलचा कसोटी कारकिर्दीतील १५०वा सामना होता.
भारतात जसे द्रविडचे वेगळे स्थान आहे, तसेच वेस्ट इंडिज संघात लारानंतर चंद्रपाॅलचे. तो कधीही चर्चेच्या केंद्रस्थानी न राहता आपल्या कामातूनच उत्तर देणारा खेळाडू. उगीच नाही त्याने १६४ कसोटी सामने असेच खेळले. गमतीचा भाग येथेही असा की भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडही चंद्रपाॅल इतकेच म्हणजे बरोबर १६४ कसोटी सामने खेळला आहे. चंद्रपाॅलही विंडीज माजी कर्णधार राहिला आहे तर द्रविडने भारताचे नेतृत्त्व केले होते.
चंद्रपॉलकडे पाहिले की एक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता लागून रहायची की हा बाबा डोळ्यांखाली नक्की लावतो तरी काय? कारण अनेक क्रिकेटपटू मैदानावर काहीतरी वेगळ्या कृती करत असतात परंतु चंद्रपाॅलच्या डोळ्याखाली जे काही होतं, तो विषयचं वेगळा होता.
प्रत्येक सामन्यात चंद्रपॉल याच लूकमध्ये दिसायचा. लहानपणी अनेकांना असे वाटायचे, की तो डोळ्यांखाली देशाचा झेंडा रंगवत असेल. त्याच्या याच कृतीमुळे भारतातील गावागावांत चंद्रपाॅलच्या देशभक्तीवर चर्चा व्हायची. परंतु वेस्ट इंडिज हा देश नसून एक संघ किंवा क्रिकेट बोर्ड आहे व त्यात कॅरेबियन बेटांवरील वेगवेगळ्या देशांचे मिळून क्रिकेटपटू क्रिकेट खेळतात हे तेव्हा फार कुणाला माहित नव्हते. असो.
भारतीय क्रिकेट चाहते डोळ्यांखाली किंवा गालावर तिरंग्याचे चित्र रंगवतात. अशाच काही गैरसमजातून चंद्रपाॅलबद्दल हे घडलं असावं. तेव्हा मात्र हा राज तरीही लोकांसमोर येत नव्हता. कारण तेव्हा माध्यमे मर्यादीत होती. खेळाडूही खूप कमी वेळा व्यक्त होतं असतं.
सोशल मीडिया नावाचा प्रकार नव्हता. त्यामुळे थेट खेळाडूशी संवादाचे माध्यमच तेव्हा उपलब्ध नव्हते. मग काळी पट्टी हा दिग्गज डोळ्याखाली का लावतो हे समजणे म्हणजे महाकठीण.
त्यात या खेळाडूचा फलंदाजीचा स्टांन्ज वेगळाच. खेळपट्टीवर उभा असताना त्याचे खांदे हे स्केअरलेग अंपायरला समांतर असायचे. चेंडू बॅटवर आल्यानंतर तो त्यावर आक्रमण करत असे. असल्या सगळ्याच विचित्र गोष्टींमुळे ज्यांनी ज्यांनी चंद्रपाॅलला खेळताना पाहिले, ते त्याला कधीच विसरु शकत नाही.
तर आपण आता परत मुळ विषयाकडे येऊ की हा खेळाडू आणि त्याच्या डोळ्याखालील काळ्या पट्ट्या. सूर्याची किरणे सरळ डोळ्यावर पडू नयेत यासाठी चंद्रपॉल डोळ्यांखाली काळ्या रंगाचे स्टिकर लावायचा. उन्हात क्रिकेट खेळताना या स्टिकरमुळे उष्णतेचा प्रभाव कमी जाणवतो. या स्टिकरला एंटी-ग्लेयर स्टिकर म्हणतात.
चंद्रपॉल क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करताना या स्टिकरसह मैदानावर उतरायचा किंवा अगदी उतरतो देखील तुम्ही म्हणून शकता. उतरतो म्हणण्याचे कारण हा पठ्ठ्या आजही आपला २४ वर्षीय मुलगा तेगनारायणने चंद्रपाॅलबरोबर क्रिकेट खेळताना दिसतो. चंद्रपाॅल आता ४५ वर्षांचा आहे.
जगातील सर्व खेळाडू मैदानावर सनग्लासेस किंवा गाॅगल्स वापरतात. अगदी जास्त उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून कॅपचाही वापर करतात. परंतु चंद्रपाॅलचा स्वॅगच वेगळा होता. त्याने सनग्लासेस किंवा गॉगल्सऐवजी सतत हे स्टिकर्स वापरायला प्राधान्यक्रम दिले.
चंद्रपॉलने १९९४ साली इंग्लंडविरूध्द कसोटी पदार्पण
१९९४मध्ये चंद्रपाॅलने कसोटी पदार्पण केले होते. जाॅर्जटाऊनमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात ६२ धावा केल्या होत्या. कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना २०१५ साली इंग्लंडविरूध्दच खेळला. ४५ वर्षीय या खेळाडूने २०१६ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. चंद्रपॉलने १६४ कसोटी सामन्यात विंडीजचे प्रतिनिधित्व केले आहे. दोन दशकांच्या क्रिकेट कारकीर्दीत ११००० हजार कसोटी धावा आणि ९००० हजार वनडे धावा चंद्रपॉलच्या नावावर आहेत. विंडीजसाठी विक्रम बनवण्याच्या बाबतीत चंद्रपॉल ब्रायन लाराच्या (Brian Lara) मागे आहे.
चंद्रपॉलचा मुलगा २४ वर्षीय तेगनारायण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये नशीब आजमावत आहे. तेगनारायणने २३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. एका सामन्यात मार्च २०१७ मध्ये पिता- पुत्राने सोबत फलंदाजी केली होती. गयाना येथे खेळल्या गेलेल्या लढतीत तेगनारायण सलामीला तर चंद्रपॉल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.