ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन हे क्रिकेट वर्तुळातील मोठं नाव समजलं जात. लेहमनच नाव घेतलं तर कधी आयपीएल खेळला हे आठवणंही कठीण जाईल. परंतू गमतीचा भाग असा की आयपीएलमध्ये एक खेळाडू व एक कोच म्हणून विजेतेपद मिळणारा तो एकमेव व्यक्ती आहे.
२००५मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या लेहमनने आयपीएलमध्ये केवळ २ सामने खेळले. वयाच्या ३८व्या वर्षी अर्थात २००८मध्ये तो आयपीएलच्या पहिल्याच हंगामात हे दोन सामने खेळला होता. तेव्हा राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या ग्रॅमी स्मिथला दुखापत झाल्यामुळे तो पहिले तीन सामने खेळणार नव्हता. त्याजागी लेहमनला दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. परंतू या दोन सामन्यात १ व १७ अशा धावा करु शकला. त्यानंतर स्मिथ परतल्यावर त्याला उर्वरित स्पर्धेत राजस्थानकडून संधी मिळाली नाही. परंतू याच हंगामात राजस्थानने आयपीएलचे पहिले विजेते होण्याचा मान मिळवला. लेहमन जरी अंतिम सामन्यात संघाचा भाग नसला तरी तो स्कॉडचा भाग होता.
त्यानंतर २००९मध्ये याच लेहमनने डेक्कन चार्जर संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली. त्याने भारताचा माजी क्रिकेटपटू व २००८मध्ये डेक्कनचं प्रशिक्षकपद सांभाळलेल्या रॉबीन सिंगची जागा घेतली होती. २००८ हंगामात डेक्कन संघाची अवस्था चांगली नसल्यामुळे लेहमनला ही जबाबदारी मिळाली. लेहमनच्याच प्रशिक्षणाखाली २००९ हंगामात डेक्कन संघाने आपले पहिले व एकमेव विजेतेपद मिळवले. २०१३मध्ये डेक्कन संघावर बंदी आल्यानंतर लेहमनने किंग्ज ११ पंजाबच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. परंतू संघ थेट ६व्या स्थानावर फेकला गेला.
लेहमन जगातील त्या मोजक्या खेळाडूंमध्ये येतो, ज्यांना सलग दोन वेळा विश्वविजेत्या संघाचा भाग होण्याचे भाग्य लाभले आहे. लेहमन १९९९ व २००३ या दोन विश्वचषकात विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. पुढे तो याच ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला परंतू चेंडू छेडछाड प्रकरणानंतर त्याने संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते.