दुबई। ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकातील सुपर १२ फेरीचा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने अर्धशतकी खेळी केली. याशिवाय त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेने विजयासाठी १५५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून सलामीला उतरलेल्या वॉर्नरने ४२ चेंडूत १० चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. याबरोबरच तो श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५०० धावा करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
वॉर्नरने श्रीलंकेविरुद्ध टी२०मध्ये १३ सामन्यांत ५६.८८ च्या सरासरीने १ शतक आणि ५ अर्धशतकांसह ५१२ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शोएब मलिकच्या नावावर ३९७ धावा आहेत. तर, श्रीलंकेविरुद्ध टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नर आणि मलिकच्या पाठोपाठ शिखर धवन (३७५), रॉय टेलर (३४२) आणि विराट कोहली (३३९) आहे.
टी२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध वॉर्नरच्या नावावर जसे सर्वाधिक धावा आहेत. तसेच कसोटीमध्ये श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू युनूस खान यांच्या नावावर आहे. श्रीलंकेविरुद्ध त्यांनी २९ कसोटी सामन्यांत २२८६ धावा केल्या आहेत. याबरोबरच श्रीलंकेविरुद्ध वनडेत सर्वाधिक विक्रम करण्याचा विक्रम भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध ८४ वनडेत ८ शतकांसह ३११३ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय
गुरुवारी ऑस्ट्रेलियाने मिळवलेला विजय टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील त्यांचा सलग दुसरा विजय ठरला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने अर्धशतकी खेळी केलीच, पण त्याचबरोबर कर्णधार ऍरॉन फिंचसह सलामीला ७० धावांची भागीदारी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा मजबुत पाया रचला गेला. फिंचने ३७ धावा केल्या.
पण ग्लेन मॅक्सवेल ५ धावांवर स्वस्तात बाद झाला. मात्र, नंतर, स्टिव्ह स्मिथ (२८) आणि मार्कस स्टॉयनिस (१६) यांनी नाबाद राहात ऑस्ट्रेलियाला १७ षटकांत १५५ धावसंख्या गाठून दिली. श्रीलंकेकडून वनिंदू हसरंगाने २ विकेट्स आणि दसून शनकाने १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेकडून कुशल परेरा आणि चरिथ असलंका यांनी प्रत्येकी ३५ धावांची खेळी केली. तसेच भानुका राजपक्षने ३३ धावांचे योगदान दिले. त्यामुळे श्रीलंकेला २० षटकात ६ बाद १५४ धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क, ऍडम झम्पा आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. झम्पाने १२ धावा देत २ विकेट्स घेतल्याने त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
फिंचचा मोठा कारनामा! ‘हा’ विक्रम करणारा ठरला ऑस्ट्रेलियाचा पहिलाच पुरुष क्रिकेटर
वॉर्नरची बॅट तळपली! ३१ चेंडूत अर्धशतक करत विराट-रोहितच्या पंक्तीत मिळवले स्थान
धक्कादायक! पाकिस्तान संघातील तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह; १० दिवस राहावे लागणार क्वारंटाईनमध्ये






