टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने स्वतःला मोठा दावेदार म्हणून सादर केले आहे. या संघाने गुरुवारी (२८ ऑक्टोबर) सुपर-१२ मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने श्रीलंकेला ७ गडी राखून पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलिया संघाला अजून टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. दुसरीकडे श्रीलंका संघ २०१४ चा विजेता संघ आहे.
श्रीलंकेने प्रथम खेळताना ६ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १७ षटकांत ३ गडी राखून लक्ष्य गाठले. डेविड वॉर्नरने ६५ धावा केल्या, तर कर्णधार ऍरॉन फिंचने ३७ धावा करत एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने आपल्या खेळीत ३७ धावा केल्या, यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २५०० धावांचा टप्पा गाठला आहे. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २५०० धावांचा टप्पा ओलांडणारा तो पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. त्याने ३२१६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील आहे. त्याने २९५६ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, त्याने २८६४ धावा केल्या आहेत. चौथ्या स्थानी आयर्लंडचा पॉल स्ट्रिलिंग आहे, त्याने २५७० धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पहिलाच पुरुष क्रिकेटपटू
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून २५०० धावांचा टप्पा पार करणारा ऍरॉन फिंच एकूण दुसरा, तर पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू मेग लँनिंग हिने हा पराक्रम केला होता. फिंचने ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ३६.९१ च्या सरासरीने २५१० धावा आत्तापर्यंत केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा विजय
गुरुवारी डेविड वॉर्नर (६५) आणि कर्णधार ऍरॉन फिंच (३७) यांनी १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६.५ षटकांत ७० धावा जोडल्या. मॅक्सवेल ५ धावा करून बाद झाला. स्टीव्ह स्मिथ २८ आणि मार्कस स्टॉइनिस १६ धावांवर नाबाद राहिले. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद २५ धावा जोडल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने १७ षटकांत श्रीलंकेने दिलेले लक्ष्य सहज पूर्ण केले.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कुसल परेरा (३५) आणि चरिथ अस्लंका(३५) यांच्या खेळीनंतर भानुका राजपक्षे (नाबाद ३३) याच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने ६ बाद १५४ धावा केल्या. राजपक्षेने आपल्या खेळीत २६ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि १ षटकार ठोकला. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पा, पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कने प्रत्येकी दोन बळी घेतले. यात झाम्पा खूपच किफायतशीर होता. त्याने चार षटकांत केवळ १२ धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरची बॅट तळपली! ३१ चेंडूत अर्धशतक करत विराट-रोहितच्या पंक्तीत मिळवले स्थान
अठरावी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा: एकूण १९ प्रकारात ४४३ सायकलपटूंचा लागणार कस
धक्कादायक! पाकिस्तान संघातील तीन खेळाडू करोना पॉझिटिव्ह; १० दिवस राहावे लागणार क्वारंटाईनमध्ये