---Advertisement---

सारांश जैनची कहर बॉलिंग; एका डावात घेतल्या 7 विकेट्स, बिहार 99 धावांवर ऑल-आऊट

On: सोमवार, ऑक्टोबर 26, 2026 5:10 PM
---Advertisement---

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा रणजी ट्रॉफीचा २०२६-२७ हंगाम सुरू आहे. यामध्ये सध्या तिसरा टप्पा सुरू असून सारांश जैनने भेदक गोलंदाजी केली आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर मध्य प्रदेश आणि बिहार यांच्यात सामना खेळला जात आहे. यामध्ये सारांश मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो.

या सामन्यात बिहारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय सारांशने पूर्णपणे चुकीचा ठरवला. त्याच्या फिरकीमुळे बिहारचा पहिला डाव ९९ धावसंख्येवर संपुष्टात आला. सारांशबरोबर आवेश खान (२) आणि कुमार कार्तिकेयननेही (१) विकेट्स घेतल्या.

बिहारचे तब्बल ३ फलंदाज शून्यावर, तर ६ फलंदाज एकेरी धावेवर बाद
सारांशच्या फिरकीसमोर बिहारचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. त्यांच्या केवळ दोन फलंदाजांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यांच्याकडून सलामीवीर मंगल महरौरने ४२ आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सुरज कश्यपने १५ धावा केल्या.

सारांशचे खास द्विशतक
या सामन्यात पाच विकेट्स घेताच सारांशने एक महत्त्वाचा टप्पा पार केला. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या. त्याने २०१४ पासून मध्ये प्रदेश संघाकडून आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीला सुरूवात केली. तेव्हापासून त्याने ६० प्रथम श्रेणी आणि ४७ लिस्ट ए सामने खेळले.

सारांशने बिहारविरुद्ध १३ षटकांत ४० धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या. ही त्याची आतापर्यंतची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

सारांशने आतापर्यंत प्रथम श्रेणीमध्ये २०२ विकेट्स आणि लिस्ट ए मध्ये ३८ विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीबरोबर त्याची फलंदाजीही उत्तम आहे. त्याने प्रथम श्रेणीमध्ये दोन शतके झळकावली आहेत. तसेच या प्रकारामध्ये त्याने १४ अर्धशतकांसह २३१२ धावा केल्या आहेत.

सारांशने याचवर्षी भारताकडून कसोटी पदार्पण केले. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळताना त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या.

मध्य प्रदेश विरुद्ध बिहार सामन्याची स्थिती
रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता (२६ ऑक्टोबर) मध्य प्रदेशने पहिल्या डावात ३ विकेट्स गमावून २६१ धावा केल्या आहेत. खेळपट्टीवर सक्षम पुरोहित (११३) आणि रजत (२१) उपस्थित आहेत. (Saransh Jain takes 7 wickets in a single innings, Bihar all out for 99 runs vs Madhya Pradesh Ranji Trophy 2026-27)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---