मुंबई। बुधवारी (११ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ५८ वा सामना डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात दिल्लीने ८ विकेट्सने सहज विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीतील आव्हान जिवंत ठेवले. दिल्लीच्या या विजयात मिशेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी अर्धशतके करत मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, वॉर्नरने एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.
वॉर्नरच्या ४०० धावा पूर्ण
वॉर्नरने (David Warner) राजस्थान रॉयल्सविरुद्ध बुधवारी ४१ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. याबरोबरच वॉर्नरने आयपीएल २०२२ मध्ये ४०० धावांचा टप्पा (400 runs in IPL season) पूर्ण केला. तसेच या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली.
त्याच्या आता आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) १० सामन्यांत ६१ च्या सरासरीने ४२७ धावा झाल्या आहेत. आयपीएल हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची त्याची ही आठवी वेळ होती. त्यामुळे सर्वाधिकवेळा एका आयपीएल हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला असून त्याने विराट कोहली आणि शिखर धवन यांची बरोबरी केली आहे.
शिखर आणि विराट यांनीही प्रत्येकी ८ आयपीएल हंगामांमध्ये ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना आहे. त्याने ९ वेळा अशी कामगिरी बजावली आहे.
सर्वाधिक आयपीएल हंगामात ४०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
९ – सुरेश रैना
८ – डेव्हिड वॉर्नर
८ – विराट कोहली
८ – शिखर धवन
७ – रोहित शर्मा
६ – एबी डिविलियर्स
दिल्लीचा विजय
बुधवारी झालेल्या सामन्यात (Rajasthan Royals vs Delhi Capitals) दिल्लीकडून वॉर्नरव्यतिरिक्त मिशेल मार्शनेही शानदार खेळी करताना ६२ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ८९ धावा केल्या. त्यामुळे दिल्लीने १८.१ षटकातच राजस्थानने विजयासाठी दिलेले १६१ धावांचे आव्हान पूर्ण केले. राजस्थानकडून युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यापूर्वी राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६० धावा केल्या. राजस्थानकडून आर अश्विनने (R Ashwin) ३८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याला देवदत्त पडीक्कलने चांगली साथ दिली. पडीक्कलने ३० चेंडूत ४८ धावा केल्या. दिल्लीकडून चेतन साकारिया, एन्रीच नॉर्किया आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ मध्ये ५८ सामन्यांत झालीये ८०० पेक्षाही जास्त षटकारांची बरसात, ‘हा’ संघ अव्वलस्थानी
आयपीएल २०२२ संपताच ‘हा’ दिग्गज सोडणार केकेआरची साथ, ज्याने पहिल्याच सामन्याला बनवलेले अविस्मरणीय
‘खूपच निराशाजनक, धावा कमी केल्या आणि…’ कर्णधार सॅमसनने स्पष्ट केले राजस्थानच्या पराभवाचे कारण