बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यात झालेल्या सामन्यात होबार्टने 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत सिडनी थंडरने 205 धावांचा भक्कम स्कोर उभारला होता. मात्र प्रत्युत्तरात होबार्ट हरिकेन्सने प्रभावी फलंदाजी करत लक्ष्य सहज गाठले.
सिडनी थंडरकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एकाकी झुंज दिली. सलामीला उतरलेल्या वॉर्नरने 65 चेंडूंमध्ये 130 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 9 षटकार लगावले. होबार्टच्या गोलंदाजांसमोर वॉर्नर पूर्णपणे आक्रमक फलंदाजी केली.
या शतकासह डेव्हिड वॉर्नरने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे. सध्या विराट कोहली, डेविड वॉर्नर आणि राइली रूसो यांच्या नावावर 9-9 शतके आहेत. या यादीत ख्रिस गेल 22 शतकांसह अव्वल स्थानावर असून बाबर आझमने 11 शतके झळकावली आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही डेव्हिड वॉर्नर विविध लीगमध्ये सातत्याने खेळत आहे. आतापर्यंत त्याने टी20 क्रिकेटमध्ये 429 सामने खेळून 13,769 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या नावावर 9 शतके आणि 113 अर्धशतके आहेत.
डेव्हिड वॉर्नरशिवाय सिडनी थंडरचे इतर फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. दुसरीकडे होबार्ट हरिकेन्सकडून टिम वॉर्डने 90 धावांची जबरदस्त खेळी केली, तर मिचेल ओवेनने 45 धावांचे योगदान दिले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 108 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला मजबूत पाया दिला. अखेरीस निखिल चौधरीने अवघ्या 14 चेंडूंमध्ये 29 धावा करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले.






