ऑस्ट्रेलियाचा संघ चेंडू छेडछाड प्रकरणामुळे सध्या चांगलाच संकटाच्या गर्तेत सापडला आहे. या चेंडू छेडछाड प्रकरणात रोज नवनावीत खुलासे होऊ लागले आहेत. तसेच या प्रकरणाचे पडसाद खेळाडूंवरही उमटलेले आहेत. याचमुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
Foxsports.com.au मधील वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने तर चेंडू छेडछाड प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा व्हॉट्सअप ग्रुपही सोडला आहे.
तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला ३२२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. याच सामन्यादरम्यान चेंडू छेडछाड प्रकरण झाले होते. पण संघ संकटात असतानाही डेव्हिड वॉर्नर क्रिकेटपटूंव्यतिरिक्त अन्य सहकाऱ्यांबरोबर मात्र हॉटेलमध्ये पार्टी करण्यात व्यस्त होता.
त्याच्या याच वागणुकीवर त्याचे संघासहकारी नाराज आहेत. या खेळाडूंनी व्यवस्थापनेला बजावलेही होते की जर वॉर्नर हॉटेलमधून निघून गेला नाही तर वॉर्नरमध्ये आणि बाकी खेळाडूंमध्ये वाद होऊ शकतात.
काही वृत्तांनुसार वॉर्नर हा या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असण्याची शक्यता आहे. चेंडू छेडछाड ही सगळी कल्पना वॉर्नरची होती. त्याला स्मिथने सहमती दर्शवली.
कालच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केल्याप्रमाणे स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन बॅनक्रोफ्ट, डेव्हिड वॉर्नर या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हे तिघेही ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आचार संहितेच्या कलम २.३.५ चा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत.
त्यामुळे ते ३० मार्चपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. तसेच ते गुरुवारी मायदेशी परततील.