fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

स्मिथ, बॅनक्रोफ्ट, वॉर्नर धरणार परतीच्या वाटा

आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना चेंडू छेडछाड प्रकरणी जबरदस्त चपराक दिली आहे. त्यांनी आज कठोर निर्णय घेतानाच स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरॉन बॅनक्रोफ्टवर निलंबनाची कारवाई केली आहे. पण याबरोबरच त्यांनी डॅरेन लेहमन प्रशिक्षक म्हणून कायम राहतील हे देखील घोषित केले आहे.

तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढील २४ तासात पुढचे निर्णय घेतले जातील असे सांगितले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेल्या चौकशीमध्ये हे तीन खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या आचार संहितेच्या कलम २.३.५ चा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. त्यामुळे हे तीनही खेळाडू गुरुवारी दक्षिण आफ्रिकेतून ऑस्ट्रेलियाला परततील.

त्यांना बदली खेळाडू म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू रेनशॉ आणि जो बर्न्स या तीन खेळाडूंना तातडीने दक्षिण आफ्रिकेत बोलावून घेतले आहे. रेनशॉला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथचा बदली खेळाडू म्हणून आधीच बोलावून घेतले होते. तर मॅक्सवेल आणि बर्न्सला त्यानंतर बोलावून घेतले आहे.

त्यामुळे रेनशॉ आज सकाळीच दक्षिण आफ्रिकेत पोहोचेल तर त्याच्या पाठोपाठ काही वेळात मॅक्सवेल आणि बर्न्सही दक्षिण आफ्रिकेत पोहचतील.

तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वृत्तानुसार स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्रोफ्टवर मोठ्या कालावधीसाठी बंदी घातली जाऊ शकते.

स्मिथ आणि बॅनक्रोफ्टने याआधीच या प्रकरणाची कबुली दिली होती. तसेच स्मिथने या प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ खेळाडूंचा सहभाग असल्याचे म्हटले होते. काही वृत्तांनुसार या प्रकरणामागे प्रमुख सूत्रधार वॉर्नर असल्याचाही संशय आहे.

त्याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज टीम पेनची नवीन कर्णधार म्हणून निवड केली आहे. तो ऑस्ट्रेलियाचा ४६ वा कसोटी कर्णधार ठरला आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज चाहत्यांची माफी मागितली आहे.

चौथ्या कसोटीसाठी असा असेल ऑस्ट्रेलियाचा संघ: जो बर्न्स, पॅट कमिन्स, पीटर हॅंड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, जॉन हॉलंड, उस्मान ख्वाजा, नॅथन लिऑन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन(कर्णधार), मॅथ्यू रेनशॉ, झी रिचर्डसन, शाड सायर्स, मिशेल स्टार्क.

You might also like