चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेतील सहावा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात झाला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात बेंगलोरने ६ धावांनी विजय मिळवला. असे असले तरी हैदराबादकडून अर्धशतकी खेळी केलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एक विक्रम केला आहे.
बेंगलोरने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नरने ३७ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावांची खेळी केली. यासह त्याच्या आता आयपीएलमध्ये १४४ सामन्यांत ४२.४८ च्या सरासरीने ५३११ धावा झाल्या आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आणि शिखर धवनला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
आयपीएलमध्ये बुधवारपर्यंत रोहितच्या नावावर २०२ आयपीएल सामन्यात ५२९२ धावा आहेत, तर धवनच्या नावावर १७६ डावांमध्ये ५२८२ धावा आहेत. त्यामुळे आता रोहित सर्वाधिक आयपीएल धावा करणाऱ्यांमध्ये चौथ्या आणि धवन पाचव्या क्रमाकंवार आहे. तसेच या यादीत ५९४४ धावांसह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा सुरेश रैना ५४२२ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वॉर्नरच्या आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५०+ धावा
वॉर्नरने बुधवारी अर्धशतक केले, ही त्याची आयपीएलमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची ५३ वी वेळ होती. विशेष म्हणजे आत्तापर्यंत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी आयपीएलमध्ये ५० पेक्षा अधिकवेळा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ४९ अर्धशतके आणि ४ शतके केली आहेत.
हैदराबादचा पराभव
या सामन्यात बेंगलोरने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून वॉर्नरने ५४ धावांची खेळी करत संघाला सुस्थितीत आणले होते. मात्र, त्याची विकेट १४ व्या षटकात पडली. त्यानंतर १७ व्या षटकात हैदराबादला तब्बल ३ धक्के बसले. शाहबाज अहमदने टाकलेल्या या षटकात हैदराबादचे जॉनी बेअरस्टो(१२), मनिष पांडे(३८) आणि अब्दुल समद(०) हे तिघेही फलंदाज बाद झाले. त्यामुळे हे षटक सामन्याला वळण देणारे ठरले.
पुढे हर्षल आणि सिराजने हैदराबादला विजयापर्यंत पोहचू न देण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यामुळे बेंगलोरने हा सामना ६ धावांनी जिंकला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने २० षटकामध्ये ८ बाद १४९ धावा केल्या. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार खेळी करत ५९ धावा केल्या. मात्र संघातील इतर सहकाऱ्यांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. मॅक्सवेलनंतर कर्णधार विराटने सर्वाधिक ३३ धावा केल्या. हैदराबाद संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबर आझमने गाजवला दिवस! सकाळी वनडेत नंबर वन, तर संध्याकाळी टी२० शतकासह पाकिस्तानला मिळवून दिला विजय
पांडेजींची कमाल! सूर मारत टिपला वॉशिंग्टन सुंदरचा लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ
मराष्ट्रात लॉकडाऊन; मुंबईतील आयपीएल सामन्यांचे काय? घ्या जाणून