मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात सोमवारी (१६ मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात सामना झाला. डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स ऍकेडमी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने १७ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच प्लेऑफसाठीची दावेदारी प्रबळ केली. पण, असे असले तरी दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झाला.
वॉर्नरची चतुराई पडली महागात?
या सामन्यात (Delhi Capitals vs Punjab Kings) पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सर्फराज खान (Sarfaraz Khan) सलामीला फलंदाजीला उतरले. सामन्यातील पहिले षटक लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingston) पंजाबकडून टाकणार होता. त्याने पहिल्याच चेंडूवर वॉर्नरला चकवले. वॉर्नरने ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड पाँइंटला झेल दिला. त्याचा झेल राहुल चाहरने पकडला. त्यामुळे वॉर्नरला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट गमवावी लागली.
विशेष गोष्ट अशी की, सामन्याचा पहिला चेंडू खरंतर सर्फराज खेळणार होता. त्याने क्रिजवर फलंदाजीसाठी स्टान्स देखील घेतला होता. त्याच्या हिशोबानेच पंजाबने क्षेत्ररक्षणही सजवले होते. वॉर्नर नॉन-स्ट्रायकरला उभा होता. पण, लिव्हिंगस्टोन गोलंदाजी करणार असल्याचे पाहून पहिला चेंडू पडण्यापूर्वीच वॉर्नर सर्फराजजवळ आला आणि नंतर त्यांच्यात काहीतरी बोलणे झाले. यानंतर वॉर्नर पहिल्या चेंडूसाठी स्वत: स्टाईक घेताना दिसला. या घटनेवरून असे दिसून येत होते की, कदाचीत वॉर्नरनेच पहिला चेंडू खेळण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाची गोष्ट अशी की वॉर्नर तब्बल ८ वर्षांनी गोल्डन डकवर (Golden Duck) म्हणजेच पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे.
वॉर्नरची विकेट घेताच लिव्हिंगस्टोनच्या नावावरही एक विक्रम जमा झाला आहे. तो आयपीएल सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा चौथाच फिरकीपटू ठरला आहे. यापूर्वी केविन पीटरसन, मार्लन सॅम्युअल्स आणि जगदीशा सुचित यांनी असा पराक्रम केला आहे. पीटरसनने २००९ साली, तर सॅम्युअल्सने २०१२ साली हा कारनामा केला. जगदीशा सुचितने याचवर्षी म्हणजे २०२२ च्या आयपीएल हंगामात असा कारनामा केला.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १५९ धावा केल्या आणि पंजाबला १६० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकात ९ बाद १४२ धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी आत्ता केवळ २४ वर्षांचा’, असं का म्हणाला रिषभ पंत? वाचा सविस्तर
दिल्लीच्या पंजाबवरील विजयानंतर कोणाला आहे प्लेऑफसाठी सर्वाधिक चान्स? जाणून घ्या समीकरण
संघमालकाने वॉर्नला इमोशनल केलं आणि राजस्थान रॉयल्स बनला पहिला आयपीएल चॅम्पियन