टी20 विश्वचषक 2024 चा उत्साह आता शिगेला पोहचला आहे. साखळी फेरीतील जवळपास सर्व सामने संपले असून आता सर्वांच्या नजरा सुपर 8 कडे आहे. दरम्यान, त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन देशांकडून खेळलेला स्टार अष्टपैलू खेळाडू डेव्हिड व्हीजे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या डेव्हिड व्हीजेची क्रिकेट कारकीर्द चमकदार राहिली. तो प्रथम आफ्रिकन संघाकडून क्रिकेट खेळला. यानंतर तो नामिबियाकडूनही मैदानात उतरला. डेव्हिड व्हीजे यानं इंडियन प्रीमियर लीगमध्येही भाग घेतला आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. त्या दरम्यान त्याचे विराट कोहलीशी संबंध चांगले होते.
डेव्हिड व्हीजेनं 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी टी20 पदार्पण केलं होतं. तर 2015 मध्ये त्यानं न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या अनुभवी खेळाडूनं त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात निष्ठा बदलली आणि नामिबियाचं प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. त्यानं 5 ऑक्टोबर 2021 रोजी नामिबियासाठी टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं नामिबियासाठी 34 टी20 सामने खेळले.
39 वर्षीय डेव्हिड व्हीजे यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 69 सामने खेळले. यामध्ये 15 एकदिवसीय आणि 54 टी20 सामन्यांचा समावेश आहे. व्हीडेनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 25.38 च्या सरासरीनं 330 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघालंय. याशिवाय त्यानं टी20 च्या 40 डावात 24.0 च्या सरासरीनं 624 धावा ठोकल्या आहेत.
डेव्हिड व्हीजेच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, या अष्टपैलू खेळाडूनं एकदिवसीय सामन्यांच्या 15 डावात 45.73 च्या सरासरीनं 15 बळी घेतले. याशिवाय, टी20 च्या 54 डावांमध्ये त्यानं 22.02 च्या सरासरीनं 59 विकेट घेतल्या आहेत.
डेव्हिड व्हीजे आयपीएलमध्ये एकूण 18 सामने खेळला. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 11 डावांत 29.6 च्या सरासरीनं 148 धावा निघाल्या. आयपीएलमध्ये गोलंदाजीत त्यानं 15 डावात 27.5 च्या सरासरीनं 16 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
नामिबियाला हरवूनही इंग्लंडच्या डोक्यावर टांगती तलवार, आता फक्त ऑस्ट्रेलियाच वाचवू शकते
भारत विरुद्ध कॅनडा सामना पावसामुळे वाया गेल्यानं सुनिल गावसकर भडकले
भारत विरुद्ध कॅनडा सामन्याला पावसानं लावली हजेरी, सामना रद्द