मुंबई । देशाच्या कानाकोपऱयातून आलेल्या दिव्यांगांना आपली चौफेर फटकेबाजी दाखविण्याची संधी देणाऱया आठव्या आंतरविभागीय एलआयसी चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दक्षिण विभागाने नूर उल हुडाच्या दमदार खेळाच्या जोरावर दोन्ही सामन्यात दणदणीत विजय नोंदवले. मात्र पूर्व विभागाला आपल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. अन्य सामन्यात पश्चिम आणि उत्तर विभागाने आपल्या विजयाचे खाते उघडण्यात यश मिळवले.
आजपासून मुंबईच्या पोलीस जिमखान्यावर सुरू झालेल्या दिव्यांगांच्या आंतरविभागीय राष्ट्रीय स्पर्धेत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दिव्यंगात्वर मात करून धडाकेबाज खेळ करणाऱया दिव्यांग क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याचे भाग्य मुंबईकरांना लाभले. नाणेफेक जिंकून दक्षिण विभागाने फलंदाजीसाठी पूर्व विभागाला आमंत्रित केले. सुब्बारावच्या अप्रतिम फिरकीच्या बळावर दक्षिण विभागाने 20 षटकांत 111 धावांपर्यंत मजल मारू दिली.
अत्यंत अडखळत खेळ करणाऱया पूर्व विभागाची 13 षटकात 6 बाद 53 अशी बिकट अवस्था होती. तेव्हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या अभिजीत बिस्वासने 40 चेंडूंत अभेद्य 46 धावा चोपून काढत त्याने आपल्या संघाला शंभरी ओलांडून दिली. त्याने तपन बैरागीबरोबर सहाव्या विकेटसाठी 31 धावांची महत्वपूर्ण भागीही केली. त्याच्या आक्रमक खेळीमुळेच पूर्व विभाग 20 षटकांत सर्वबाद 111 धावांपर्यंत मजल मारू शकला.
दक्षिण विभागाने पूर्व विभागाच्या आव्हानामधील हवा नूर उल हुडाच्या झंझावाती खेळीनेच काढली. दक्षिण विभागाने पहिल्या पाच षटकांत आपले दोन फलंदाज गमावले. मात्र त्यानंतर हुडाने सुब्बारावबरोबर 43 धावांची भागी रचून आपल्या संघाची विजयी सलामी निश्चित केली. हुडाने 35 चेंडूत 46 धावा करताना 3 चौकार आणि 4 खणखणीत षटकार खेचले. दक्षिण विभागाने 14 व्या षटकांतच आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
सुब्बारावने 13 चेंडूंत 4 चौकारांसह 19 धावा केल्या. दक्षिण विभागाने आपल्या दुसऱया सामन्यात मध्य विभागाचे 125 धावांचे आव्हान 2 फलंदाजांच्या बदल्यात अकराव्या षटकांतच गाठले. या विजयातही हुडाची नाबाद 53 धावांची खेळी महत्वाची ठरली. त्याने मंजुनाथ बरोबर तिसऱया विकेटसाठी 108 धावांची अभेद्य भागी रचली.
अन्य एका सामन्यात यशसिंग नेगीच्या 38 चेंडूंतील झंझावाती 88 धावांमुळे उत्तर विभागाने 20 षटकांत 202 धावांचा डोंगर उभारला होता. नेगीने आपल्या या खेळीत 12 चौकारांसह 4 षटकारांची आतषबाजी केली. हरिवंश चौहाननेही 36 धावांची फटकेबाज खेळी करून संघाच्या फलकावर द्विशतकी अंक लावला. मध्य विभागाचा एकही गोलंदाज या सामन्यात अपेक्षित मारा करू शकला नाही.
मात्र 203 धावांचा पाठलाग करताना त्यांच्या फलंदाजांनी छोट्या छोट्या खेळ्या करून संघाचा फलक हलता ठेवला. मात्र अपेक्षित धावांची गती राखण्यात त्यांचे फलंदाज अपयशी ठरले. परिणामता मध्य विभागाने 20 षटकांत 8 बाद 175 अशी मजल मारली आणि उत्तर विभागाने हा सामना 27 धावांनी आपल्या खिशात घातला. तसेच चौथ्या सामन्यात केवल पटेलच्या 54 धावांमुळे पश्चिम विभागाने 6 बाद 148 अशी धावसंख्या उभारली.
या धावांचा पाठलाग करताना बलराम बस्तियाने 65 धावांची एकाकी झुंज दिली. त्याला अन्य कुणाचीही साथ न लाभल्याने त्यांचा संघ 123 धावांपर्यंत पोहचू शकला.
त्या अगोदर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिव्यांग क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ आणि माजी कर्णधार अजित वाडेकर, न्यू इंडिया ऍश्युरन्सचे महाव्यवस्थापक एस. शंकर, एलआयसीचे पंकज गोपाल, युनियन बँकेचे अशोक नायर, माजी कसोटीपटू करसन घावरी आणि उमेश कुलकर्णी, सेंट्रल बँकेचे के.के.तनेजा, राज्याचे उप क्रीडा संचालक एन.बी.मोटे, दिव्यांग संघटनेचे सरचिटणीस विनायक धोत्रे आणि कोषाध्यक्ष राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
संक्षिप्त धावफलक
पूर्व विभाग- 20 षटकांत सर्वबाद 111 (अभिजीत बिस्बास नाबाद 46; सुब्बाराव 15 धावांत 3 बळी), पराभूत वि. दक्षिण विभाग – 13.4 षटकांत 4 बाद 112 ( नूर उल हुडा 46, सुगणेश 19, सुब्बाराव नाबाद 18 ; अभिजीत बिस्वास9 धावांत 1 बळी)
पश्चिम विभाग- 15 षटकांत 6 बाद 148 ( मयुरेश संसारे 33, केवल पटेल 54; राजेंद्र प्रसाद 32 धावांत 2 बळी) विजयी वि. पूर्व विभाग -15 षटकांत 6 बाद 123 ( बलराम बस्तिया 65, भोला बौरी 34 ; केवल पटेल 17 धावांत 2 बळी, अजय म्हात्रे 25 धावांत 2 बळी)
उत्तर विभाग- 20 षटकांत 9 बाद 202 ( यशसिंग नेगी 88, विश्ववर्धन 23, बिजेंदर सैनी 36 ; सलमान 30 धावांत 2 बळी) विजयी वि. मध्य विभाग -20 षटकांत 8 बाद 175 ( महताब अली नाबाद 42, सलमान 25, यशवंत वाघ 25 ; दिनेश कुमार 35OeeJeeble 2 बळी, विश्ववर्धन 36 धावांत 2 बळी)
मध्य विभाग- 15 षटकांत 5 बाद 125 ( गजानंद 44, सलमान 29; सुगणेश 15 धावांत 2 बळी) पराभूत वि. दक्षिण विभाग – 10. 3 षटकांत 2 बाद 126 ( नूर उल हुडा नाबाद 53, मंजुनाथ नाबाद 40 ; रोवेश 19 धावांत 1 बळी)