पुणे । कोल्हापूरचा रणजीत नलावडे, लातूरचा देवानंद पवार, सांगलीचा मनोज कोडग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करताना पुणे महापौर चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा उदघाटन समारोह आयोजक मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै. गणपतराव आंदळकर, एमआयटीचे संस्थापक प्रा. विश्वनाथ कराड, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टाकले, राष्ट्रीय तालीम संघाचे कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, ऑलिम्पिकवीर मारुती आडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे मेघराज कटके, गणेश दांगट, आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव किसन बुचडे, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
७९ किलो वजनी गटात झालेल्या लढतीत कोल्हापूरच्या रणजीत नलावडे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करताना नाशिकच्या विजय सुरुंडेला १०-० असे एकतर्फी पराभूत करताना स्पर्धेत विजयी सलामी दिली.
लातूरच्या देवानंद पवारने पुण्याच्या अतुल आंग्रेला पराभूत करताना ६५ किलो गटातील आपली आगेकूच कायम राखली.
सांगलीच्या मनोज कोडगने मुंबईच्या अभिषेक तुर्केवाडकरला तांत्रिक गुणांनी पराभूत करताना स्पर्धेतील पहिला विजय साकारला.
९२ किलो वजनी गटात नाशिकच्या हर्षल सदगीरने अहमदनगरच्या सुहास गोडगेला तांत्रिक गुणांच्या सहाय्याने १०-० असे पराभूत करताना स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.