सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २९ षटकात २ बाद ९० धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३०७ धावा केल्या होत्या. भारताकडून आज विराट कोहलीने दीडशतकी खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सलामीवीर एडन मार्करमला(१) आणि अनुभवी फलंदाज हाशिम अमलाला(१) पायचीत बाद करत भारताला सुरुवातीलाच यश मिळवून दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची २ बाद ३ धावा अशी बिकट अवस्था झाली.
त्यानंतर मात्र एबी डिव्हिलियर्स आणि सलामीवीर फलंदाज डीन एल्गार यांनी डाव सावरला. डिव्हिलियर्सने नाबाद ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर एल्गारने नाबाद ३६ धावा केल्या आहेत. या दोघांनी मिळून ८७ धावांची नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. सध्या दक्षिण आफ्रिका ११८ धावांनी आघाडीवर आहे.
तत्पूर्वी भारताकडून कर्णधार विराट कोहलीने २१७ चेंडूत १५३ धावा केल्या. त्याच्या या दीडशतकी खेळीत त्याने १५ चौकार मारले. मात्र त्याला बाकी फलंदाजांनी हवी तशी साथ दिली नाही. काल दुसऱ्या दिवसाखेर विराटबरोबर नाबाद असलेला पार्थिव पटेलला आज १९ धावांवर लुंगी एन्गिडीने बाद केले.
त्यानंतर खेळायला आलेला हार्दिक पंड्यालाही विशेष काही करता आले नाही. तो १५ धावांवर धावबाद झाला. पांड्याला व्हर्नोन फिलँडरने सुरेख धावबाद केले.पंड्याला दिलेल्या धावबादच्या अवघड निर्णयाबद्दल पंचांचे जोरदार कौतुक झाले.
विराटला आर अश्विनने चांगली साथ दिली. या दोघांनी मिळून ७ व्या विकेटसाठी ७१ धावांची अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र ही जोडी फोडण्यात फिलँडरला यश आले. त्याने अश्विनला ३८ धावांवर बाद केले.
यानंतर इशांत शर्मा(३) आणि जसप्रीत बुमराहने विराटला थोडीफार साथ दिली. मात्र इशांतला मोर्ने मॉर्केलने बाद केले आणि नंतर विराटला बाद करत मॉर्केलने भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने २८ धावांची आघाडी घेतली.
संक्षिप्त धावफलक:
दक्षिण आफ्रिका पहिला डाव: सर्वबाद ३३५ धावा
भारत पहिला डाव:सर्वबाद ३०७ धावा
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव: २ बाद ९० धावा
एबी डिव्हिलियर्स(५०*) आणि डीन एल्गार(३६*) खेळत आहेत.