एकेकाळी कोलकाताच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण करणारा व्यक्ती आता भारतीय संघात थ्रो-डाउन विशेषज्ञ बनला आहे. 28 वर्षांचा दयानंद गिरानी या महिन्याच्या 12 तारखेला भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे तो भारतीय संघातील फलंदाजांना सराव करण्यासाठी मदत करणार आहे.
कोलकाता राज्यातील मिदणापूर जिल्ह्यात सुदूर या लहानशा गावात राहणारा दयानंद गिरानी हा कोलकाता शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण करीत होता. पण त्याला यूएई येथे सुरू असलेल्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघासह थ्रो-डाउन विशेषज्ञ बनण्याची संधी मिळाली आणि तो यूएईसाठी रवाना झाला. केएल राहुल, ख्रिस गेल अशा मोठ्या फलंदाजांना त्याने सराव दिला.
थ्रो-डाउन विशेषज्ञचे काम म्हणजे फलंदाजांना वेगवान चेंडू फेकून सराव देणे. आयपीएल संपताच तो भारतात परतणारच होता, परंतु बीसीसीआयने त्याच्याशी संपर्क करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयार राहण्यास सांगितले. यानंतर आता दयानंद विराट कोहली समवेत भारताच्या इतर दिग्गज खेळाडूंना चेंडू फेकून सराव देणार आहे. भारतीय संघाचे नियमित थ्रो-डाऊन विशेषज्ञ रघू यांना कोरोनाची लागण झाल्याने भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाला जाऊ शकत नाही.
या निवडी नंतर दयानंद पीटीआयशी बोलताना म्हणाला, “मी संपूर्ण जीवनात देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले होते आणि माझ्यासाठी ही एक संधी आहे. मला वाटलं नव्हतं ती इतक्या लवकर मिळेल. आयपीएल मधील माझे काम त्यांनी पाहिलं असेल. आता हा माझ्या जीवनातील खूप सुंदर असा क्षण आहे.”
आयपीएलच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आव्हान जरा जास्त असणार आहे. दयानंदपूर्वी शरीराने सुडौल असल्याचे तो म्हणतो. फलंदाजांना 140 पेक्षा जास्त गतीने थ्रो-डाउन गोलंदाजी करण्यासाठी तो आता तयार आहे. संपूर्ण जीवन गरिबीत व्यतीत केल्या नंतर त्याच्या आयुष्यात ही सोन्याची सकाळ उगवली आहे, असे नक्कीच त्याला वाटणे साहजिक आहे.
दयानंदने नागरी पोलिस म्हणून काम करत असताना क्रिकेट स्पर्धांमध्ये स्थानिक पातळीवर कोलकाता पोलिसांचे प्रतिनिधित्व केले आहे. तो बंगालमधील ट्रेनर संजीव हारु दास यांच्या संपर्कात आल्यानंतर २०१६ मध्ये आंध्र रणजी संघाशी जोडला गेला होता. त्यावेळी त्याने हनुमा विहारी, रिकी भुई यांना थ्रोडाऊन करत सराव दिला होता. तसेच त्याचे नाव थ्रो-डाऊन विशेषज्ञ म्हणून किंग्स इलेव्हन पंजाबला मुनीश बाली यांनी सुचवले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडला शिखर धवन; नावावर केले ३ खास विक्रम
महिला आयपीएल फायनल : सुपरनोवाज हॅट्रिक साधणार की ट्रेलब्लेझर पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
…तर रोहित जाणार नाही ऑस्ट्रेलियाला; विराटही ३ कसोटी सामन्यांना मुकण्याची शक्यता