आयपीएलमध्ये मंगळवारी (29 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव केला. हैदराबादने दिलेल्या 163 धावांचा पाठलाग करतांना दिल्लीला 20 षटकात केवळ 147 धावा करता आल्या. हैदराबाद संघाचा या हंगामातील पहिलाच विजय होता.
सामन्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर हा संघाच्या कामगिरीवर निराश होता. योजना अंमलात आणण्यात संघ यशस्वी झाला नाही असे त्याला वाटते.
हैदराबादने केली चांगली कामगिरी
सामन्यानंतर बोलताना अय्यर म्हणाला, “आम्ही हैदराबादला 162 धावांवर रोखले याचा आम्हाला आनंद झाला. या खेळपट्टीवर हे लक्ष्य गाठणे कठीण नव्हते. खेळपट्टी कशी असेल याची आम्हाला कल्पना नव्हती कारण या खेळपट्टीवर आमचा हा पहिलाच सामना होता. तिन्ही विभागात हैदराबादने चांगली कामगिरी केली. जेव्हा मी फलंदाजीला गेलो, तेव्हा चेंडू बॅटवर येत नव्हता. आम्हाला वाटले की मैदानात दव पडेल, पण आता आम्हाला कोणतेच निमित्त द्यायचे नाही. आम्ही आमच्या योजना अंमलात आणण्यात अयशस्वी झालो.”
खेळपट्टीमुळे झाला त्रास
अबू धाबी येथे दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिलाच सामना होता. या खेळपट्टीमुळे दिल्लीच्या फलंदाजांना फलंदाजी करतांना बराच त्रास झाला.
येथील परिस्थितीबद्दल बोलताना अय्यर म्हणाला, “या परिस्थितीतून बरेच काही शिकायला मिळाले. आम्हाला एका मोठ्या भागीदारीची आवश्यकता होती. हे मैदान खूप मोठे आहे आणि दोन धावा घेण्याची कोणतीच संधी आम्ही गमावली नाही. आम्हाला माहित होते की येथे चौकार मारणे कठीण आहे, त्यामुळे आम्ही एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण ही योजना प्रभावी ठरू शकली नाही. पुढच्या वेळी आम्ही चांगली कामगिरी करू.”