दुबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील बाद फेरीला म्हणजेच प्लेऑफला रविवारी (१० ऑक्टोबर) सुरुवात झाली. रविवारी पहिला क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या गुणतालिकेतील अव्वल दोन संघात झाला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ४ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७२ धावा करत चेन्नईसमोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने १९.४ षटकात ६ विकेट्स गमावत पूर्ण केला. चेन्नईककडून ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने अर्धशतकं केली.
चेन्नईकडून १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस सलामीला उतरले. पण, डू प्लेसिस फार काळ टिकू शकला नाही. त्याला पहिल्याच षटकात एन्रीच नॉर्किएने सुरेश चेंडू टाकत त्रिफळाचीत केले. डू प्लेसिस १ धावेवर बाद झाला.
यानंतर ऋतुराज आणि रॉबिन उथप्पाने चेन्नईला भक्कम स्थितीत उभे केले. या दोघांनी शानदार फलंदाजी करताना शतकी भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यान त्यांनी वैयक्तिक अर्धशतकंही पूर्ण केली. पण ही भागीदारी टॉम करनने उथप्पाला बाद करत तोडली. त्याला अफलातून झेल बाऊंड्री लाईनजवळ श्रेयस अय्यरने घेतला.
त्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही त्याच षटकार करनने अय्यरच्याच करवी झेलबाद केले. तर १५ व्या षटकात अंबाती रायडू १ धावेवर धावबाद झाला. यानंतर ऋतुराजला मोईन अलीने चांगली साथ दिली होती. पण, १९ व्या षटकात अवेश खानने ऋतुराजला ७० धावांवर बाद करत सामन्यात रोमांच आणला. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी मैदानात आला.
चेन्नईला ११ चेंडूत २४ धावांची गरज होती. याचवेळी १९ व्या षटकात धोनी आणि मोईनने मिळून १ चौकार आणि १ षटकारासह ११ धावा वसूल केल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात चेन्नईला १३ धावांची गरज होती. पण मोईन पहिल्याच चेंडूवर १६ धावांवर बाद झाला. मात्र, नंतर धोनीने तीन चौकार खेचत चेन्नईला विजय मिळवून दिला. धोनीने आक्रमक खेळ करताना शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना चौकार मारुन चेन्नईसाठी नवव्यांदा अंतिम सामन्याची दारं खुली केली. धोनी ६ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह १८ धावांवर नाबाद राहिला.
दिल्लीकडून टॉम करनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. एन्रीच नॉर्किए आणि अवेश खानने प्रत्येकी १ विकेट घेतली.
पंत आणि शॉचे अर्धशतक
या सामन्यात चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने डावाची सुरुवात केली. शॉने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती. पण शिखर मात्र लवकर बाद झाला. त्याला चौथ्या षटकात जोश हेजलवूडने ७ धावांवर बाद केले. त्याच्यापाठोपाठ ६ व्या षटकात श्रेयस अय्यर १ धाव करुन हेजलवूजविरुद्धच खेळताना ऋतुराज गायकवाडकडे झेल देत बाद झाला.
पण, यावेळी एक बाजू पृथ्वी शॉने सांभाळून ठेवली होती. त्याने २७ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्याला अक्षर पटेलने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण, अक्षरला १० व्या षटकात मोईन अलीने १० धावांवर बाद केले. पाठोपाठ ११ व्या षटकात शॉला रविंद्र जडेजाने फाफ डू प्लेसिस करवी झेलबाद केले. शॉने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या.
पण, यानंतर कर्णधार पृथ्वी शॉ आणि शिमरॉन हेटमायर यांनी संघाचा डाव सांभाळत अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाला १६० धावांच्या पार नेले. या दोघांनी काही आक्रमक फटकेही खेळले. या दोघांची जोडी मैदानावर जमली होती. पण अखेर ड्वेन ब्रावोने १९ व्या षटकात शिमरॉन हेटमायरला ३७ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे त्याची पंतबरोबरील ८३ धावांची भागीदारी तुटली.
पण अखेरच्या षटकात पंतने ८ धावा काढत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे दिल्लीने २० षटकात ५ बाद १७२ धावा केल्या. पंत ३५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला.
चेन्नईकडून जोश हेजलवूडने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो आणि मोईन अलीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
असे आहेत दोन्ही संघ
या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने अंतिम ११ जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. तसेच दिल्लीने अंतिम ११ जणांच्या संघात १ बदल केला आहे. त्यांनी रिपल पटेल ऐवजी टॉम करनला संघात संधी दिली आहे.
असे आहेत ११ जणांचे संघ –
दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, पृथ्वी शॉ, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, टॉम करन, अवेश खान, एन्रिच नॉर्किए
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवुड.