शारजाह। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने ३ विकेट्सने विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर दिल्लीचा प्रवास या हंगामातील या सामन्यानंतर संपला.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १३५ धावा केल्या. त्यामुळे कोलकातासमोर विजयासाठी १३६ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग कोलकाताने १९.५ षटकात ७ विकेट्स गमावत पूर्ण केला.
कोलकाताकडून १३७ धावांचे आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर ही सलामीवीरांची जोडी उतरली. या दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजांना पहिले १२ षटकात मोठे यश मिळू दिले नाही. या दोघांनी काही आक्रमक फटके मारत तब्बल ९६ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे कोलकाताच्या विजयाचा पाया रचला गेला. या दोघांची जोडी व्यंकटेश अय्यरला कागिसो रबाडाने १३ व्या षटकात बाद करत तोडली.
अय्यरने अर्धशतक करताना ४१ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर शुबमन गिलला नितीश राणाने साथ दिली. पण, राणा फार काळ टिकू शकला नाही. १६ व्या षटकात तो एन्रीच नॉर्किएच्या गोलंदाजीवर हेटमायरकडे झेल देऊन १३ धावांवर बाद झाला.
कोलकाता विजयाच्या जवळ आल्यानंतर गिलही ४६ धावांवर १७ व्या षटकात अवेश खानच्या चेंडूवर यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला. तर कार्तिकला १८ व्या षटकात रबाडाने त्रिफळाचीत केले. तर १९ व्या षटकात ओएन मॉर्गनला एन्रीच नॉर्किएने त्रिफळाचीत करत सामन्यात रंगत आणली. सातत्याने विकेट गेल्याने सामना रोमांचक वळणावर आला होता.
अखेरच्या षटकात कोलकाताला ७ धावांची गरज होती. हे षटक आर अश्विनने टाकले. त्याने सुरुवातीला उत्तम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या चेंडूवर १ धाव दिल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तर तिसऱ्या चेंडूवर शाकिब अल हसनला आणि चौथ्या चेंडूवर सुनील नारायणला माघारी धाडले. अखेर राहुल त्रिपाठीने ५ व्या चेंडूवर षटकार ठोकत कोलकाताला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे कार्तिक, मॉर्गन, शाकिब आणि नारायणला भोपळाही फोडता आला नाही. राहुल त्रिपाठीने नाबाद १२ धावा केल्या.
दिल्लीकडून एन्रीच नॉर्किए, कागिसो रबाडा आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच अवेश खानने १ विकेट घेतली.
कोलकाताचे गोलंदाज चमकले
या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी आश्वासक सुरुवात केली. पण, त्यांची जोडी जमली असं वाटत असतानाच शॉ १८ धावांवर वरुण चक्रवर्तीविरुद्ध खेळताना बाद झाला.
त्यानंतर मार्कस स्टॉयनिसला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. त्याने धवनची चांगली साथ देताना सावध खेळ केला. मात्र, स्टॉयनिस देखील १२ व्या षटकात १८ धावांवर बाद झाला. त्याला शिवम मावीने त्रिफळाचीत केले.
पाठोपाठ खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शिखर धवनला वरुण चक्रवर्तीने १५ व्या षटकात माघारी धाडले. शिखरने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या. पुढच्याच षटकात कर्णधार रिषभ पंत लॉकी फर्ग्यूसनच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीकडे झेल देत ६ धावांवर बाद झाला. पण, त्यानंतर श्रेयस अय्यरने संयमी खेळ करत, तर दुसऱ्या बाजूने हेटमायकने फटकेबाजी करत दिल्लीला ११० धावा पार करुन दिल्या.
मात्र, हेटमायर १९ व्या षटकात १७ धावांवर धावबाद झाला. पण अखेर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीत दिल्लीला २० षटकात ५ बाज १३५ धावांपर्यंत पोहचवले. अय्यर २७ चेंडूत ३० धावांवर नाबाद राहिला. तर अक्षर ४ धावांवर नाबाद राहिला.
कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर लॉकी फर्ग्युसन आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
असे आहेत ११ जणांचे संघ
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, एन्रिच नॉर्किए
कोलकाता नाईट रायडर्स: शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), सुनील नारायण, शाकीब अल हसन, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.