---Advertisement---

दिल्ली क्रिकेट बोर्डाच्या बैठकीत मारामारी, गंभीरने शेअर केला व्हिडिओ

---Advertisement---

रविवारी(29 डिसेंबर) भारतीय क्रिकेट वर्तुळात एक लाजिरवाणी घटना घडली आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनची रविवारी सर्वसाधारण वार्षिक बैठक पार पडली. या बैठकिदरम्यान अधिकाऱ्यांमध्ये इतके जोरदार भांडण जुंपले की प्रकरण मारामारी पर्यंत गेले.

त्यामुळे अनेकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरचाही समावेश आहे.

दिल्लीचा माजी कर्णधार असणाऱ्या गंभीरने या मारामारी दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत डीडीसीए आणि या मारामारीमध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर बंदीची मागणी केली आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की अरुण जेटली स्टेडियमवर ही बैठक झाली. या बैठकीदरम्यान व्यासपीठावरील अधिकारी एकमेकांशी मारामारी करत भांडत आहेत. यामध्ये सहसचिव राजन मनचंदाही यांचाही समावेश असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना गंभीरने ट्विट केले आहे की ‘डीडीसीएने निर्लज्जपणे सर्व मर्यादा ओलांडल्या. काही असामाजिक सदस्य एखाद्या संस्थेची थट्टा कसे करतात ते पहा. मी बीसीसीआय, सौरव गांगुली, जय शाह यांना डीडीसीए त्वरित विसर्जित करण्याची मागणी करतो. तसेच या घटनेत सामील असलेल्या व्यक्तींना शिक्षा किंवा आजीवन बंदी घालण्यात यावी.’

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे आता यावर बीसीसीआयचा अध्यक्ष गांगुली काय निर्णय घेणार हे पहावे लागेल.

विशेष म्हणजे याच बैठकीदरम्यान डीडीसीएने सेवानिवृत्त न्यायाधीश दीपक वर्मा यांना नवा लोकपाल म्हणून नियुक्त केले. तसेच डीडीसीएच्या अध्यक्षपदासाठी 13 जानेवारीला निवडणूक होईल, असाही निर्णय रविवारी घेण्यात आला. याच दरम्यान हा गदारोळ झाला.

काही दिवसांपूर्वी डीडीसीएचे माजी अध्यक्ष रजत शर्मा यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्षपद रिक्त होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---