भारत व दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा दुसरा टी20 सामना गुवाहाटी येथे खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 237 धावा उभारलेल्या. याचा पाठलाग करताना डेव्हिड मिलर व क्विंटन डी कॉक यांनी शानदार फलंदाजी केली. मात्र, तरीही भारतीय संघाने 16 धावांनी विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. दक्षिण आफ्रिकेसाठी मिलर व डी कॉकने 174 धावांची भागीदारी केल्यानंतरही विजय मिळवू न शकल्याची खंत डी कॉकने व्यक्त केली.
भारतीय संघाने 238 धावांचे आव्हान दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली होती. 50 धावांवर तीन गडी बाद झाल्यानंतर क्विंटन डी कॉक व डेव्हिड मिलर यांनी अखेरपर्यंत विजयासाठी शर्थीच प्रयत्न केले. दोघांनी 174 धावांची नाबाद भागीदारी केली. परंतु, ते संघाला विजयी रेषेपार नेऊ शकले नाहीत. मिलरने 47 चेंडूत 8 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 106 धावा चोपल्या. दुसरीकडे सलामीला आलेल्या डी कॉकला धावांची अपेक्षित गती राखता आली नाही. तो अखेर पर्यंत नाबाद राहिला मात्र 48 चेंडूवर केवळ 69 धावा करू शकला. यात 3 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.
या रोमांचक सामन्यानंतर रवी शास्त्री यांच्याशी बोलताना डेव्हिड मिलर याने डी कॉकबाबत एक खुलासा केला. मिलरने सांगितले
“सामना संपल्यानंतर तो मला म्हणाला, तू शानदार खेळलास मात्र मला माफ कर.”
त्याच्या या खिलाडूवृत्तीमुळे त्याचे सोशल मीडियावर देखील कौतुक होत आहे. डी कॉक आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकला असता तर, दक्षिण आफ्रिका भारताला पराभूत करू शकली असती, असे अनेक समीक्षकांनी तसेच समालोचकांनी म्हटले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना गमावला मात्र ‘किलर मिलर’च्या शतकाने जिंकली सर्वांची मने
सरफराज खानची ‘फर्स्ट क्लास’ इनिंग, ब्रॅडमन यांना टाकले मागे!