दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याला ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात समाविष्ट करण्यात आले नाही. त्याला संधी न दिल्यामुळे अनेक क्रिकेट समीक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्लेसिसने नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी ट्रम्पकार्ड ठरू शकणाऱ्या तीन खेळाडूंची नावे सांगितली.
हे खेळाडू ठरू शकतात ट्रम्पकार्ड
विश्वचषकासाठी संघात निवड झाली नसली तरी प्लेससिसने या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वोत्तम कामगिरी करू शकणाऱ्या व ट्रम्पकार्ड ठरू शकणाऱ्या तीन खेळाडूंची नावे सांगितली.
तो म्हणाला, “विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संतुलित संघ पाठवला गेला आहे. माझ्या मते अनुभव यष्टीरक्षक व सलामीवीर क्विंटन डी कॉक, युवा वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए व गोलंदाजांच्या जागतिक टी२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला चायनामन फिरकीपटू तबरेज शम्सी हे ट्रम्पकार्ड ठरू शकतात.”
या विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने प्लेसिससह अनुभवी लेगस्पिनर इम्रान ताहीर व अष्टपैलू ख्रिस मॉरिस यांचीदेखील निवड केली नाही.
आयपीएलमध्ये खेळताना दिसेल प्लेसिस
विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघाचा भाग नसला तरी, प्लेसिस १९ सप्टेंबरपासून युएई येथे सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित हंगामात खेळताना दिसेल. तो एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. कोरोनामुळे हा हंगाम स्थगित केला गेला तेव्हा प्लेसिस ७ सामन्यात ६४ च्या सरासरीने ३२० धावा करत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसर्या क्रमांकावर होता.
टी२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ-
टेंबा बवुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), ब्योर्न फोर्च्युन, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, डब्ल्यू मुलडर, लुंगी एनगिडी, एन्रिक नॉर्किए, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, व्हॅन डर डसेन
राखीव: जॉर्ज लिंडे, अँडिले फेहलुकवायो, लिझाद विल्यम्स