आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या नव्या हंगामासाठी संघांनी तयारी सुरू केली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली नेतृत्व करत असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यावर्षी प्रथमच आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यासाठी उत्सुक आहे.
आरसीबीच्या या अभियानात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मागील काही वर्षापासून नियमितपणे यष्टीरक्षण न करणारा डिव्हिलियर्स आगामी हंगामात यष्टीरक्षण करणार का? याचे उत्तर आरसीबीचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी दिले आहे.
डिव्हिलियर्सविषयी हेसन म्हणाले
आरसीबीसाठी क्रिकेट संचालक हे पद सांभाळणारे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन पुढील आयपीएल हंगामाच्या तयारीसाठी भारतात दाखल झाले आहेत.
त्यांनी एका मुलाखतीत बोलताना आरसीबीचा वरिष्ठ खेळाडू एबी डिव्हिलियर्स याच्या आगामी हंगामातील यष्टीरक्षण करण्याविषयी म्हटले, “आमच्याकडे केएस भरत व मोहम्मद अजहरुद्दिन हे दोन यष्टीरक्षक आहेत. जोशुआ फिलीपे स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर त्याच्या जागी फिन ऍलन संघात सामील झाला आहे. मात्र, एबी पुन्हा एकदा यष्टीरक्षण करण्यास उत्सुक असल्याने, आम्ही उत्साहित आहोत.”
मागील वर्षी डिव्हिलियर्सने बऱ्याच कालावधीनंतर यष्टीरक्षण केले होते. त्यापूर्वी पार्थिव पटेल आरसीबीसाठी यष्टीरक्षण करत.
डिव्हिलियर्सच्या कामगिरीवर सर्वांची नजर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला एबी डिव्हिलियर्स हा सध्या केवळ आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. तो २०११ पासून आरसीबीचा भाग आहे. आरसीबीला पहिल्यांदा आयपीएल विजेतेपद मिळवायचे असल्यास त्याला विशेष कामगिरी करून दाखवावी लागेल.
आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने डिव्हिलियर्सचा फॉर्म महत्त्वाचा असणार आहे. कारण, त्याने टी२० विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा मनोदय बोलून दाखवला होता. हा विश्वचषक या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतात खेळविण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या –
मागील ४३ डावांपासून सुरु असलेल्या शतकांच्या दुष्काळाबद्दल विराट कोहलीचे मोठे भाष्य; म्हणाला…
टीम इंडियाच्या गोलंदाजांना ट्रोल करायला गेलेला सेहवागच पडला तोंडघशी, करावं लागलं ‘ते’ ट्विट डिलीट