क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कोणत्या क्षणी काय घडेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. ही अनिश्चितता केवळ मैदानापर्यंतच मर्यादित नसते; तर मैदानाबाहेरही याची बरीचशी उदाहरणे पाहायला मिळतात. असेच काहीसे उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले आहे. झिम्बाब्वेचे समालोचक डीन डू प्लेसीस यांनी त्यांच्या समालोचनाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ते नेत्रहीन अर्थात अंध असूनही फलंदाजाने कोणत्या दिशेला शॉट खेळला?, गोलंदाजाने कोणत्या प्रकारचा चेंडू टाकला?, हे अगदी योग्यरित्या सांगू शकतात.
क्रिकेटमध्ये आंधळ्या खेळाडूंची एक वेगळी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाते. यामुळे नेत्रहीन क्रिकेटपटूंनाही त्यांच्यातील कौशल्ये दाखवण्याची संधी मिळते. ४४ वर्षीय डीन डू प्लेसीस हे पहिले असे समालोचक आहेत, जे नेत्रहीन असूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे समालोचन करतात.
डीन डू प्लेसीस यांचा जन्मावेळी त्यांच्या डोळ्यांतील पडद्यामागे (रेटिना) ट्यूमर असल्याचे आढळले होते. त्यामुळे ते जन्मापासूनच नेत्रहीन आहेत. डीन डू प्लेसिस यांनी सांगितले आपल्या समालोचनाबद्दल की, “आवाज ऐकून क्रिकेटचे समालोचन करण्याची एक वेगळीच मजा असते. मी स्टंप माइकमध्ये खेळाडूंचे आवाज ऐकतो आणि त्यावरुन सामन्याची स्थिती सांगतो. मी कोणत्याही प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करत नसून सामन्यातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवतो. यामुळे मला समालोचनात मदत होते.”
डीन डू प्लेसिस यांना बालपणीपासूनच क्रिकेटची आवड राहिली आहे. ते लहान असताना रेडिओवर क्रिकेटचे समालोचन ऐकत असत. यावरुन त्यांना गोलंदाज आणि फलंदाजांच्या हालचालींची चांगलीच ओळख पटली आहे.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “चालू सामन्यातील स्थिती जाणून घेण्यासाठी मला कोणाच्याही मदतीची आवश्यकता भासत नाही. मी कोणता गोलंदाज कोणत्या प्रकारची गोलंदाजी करत हेसुद्धा न चुकता सांगू शकतो. उदाहरणार्थ, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड जेव्हा गोलंदाजी करतो, तेव्हा त्यांच्या चेंडूचा घासण्याचा आवाज येतो. त्याने फलंदाजांची विकेट चटकावली तर तो एक ठराविक आवाज काढतो. फलंदाजांविषयी सांगायचे झाले, जेव्हाही फलंदाज ऑफ साइडला शॉट खेळतो, तेव्हा नेहमीच मोठा आवाज येत असतो. जर त्याने लेग साइडला शॉट खेळला, तर त्याच्या बॅटचा आवाज थोडा कमी होतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कसोटी चॅम्पियनशीपची जंगी तयारी; कसोटीपटू चेतेश्वर पुजारा ‘अशी’ घेतोय मेहनत
ब्रेकिंग! इंग्लंडनंतर भारतीय महिला संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर, जय शहा यांनी केली घोषणा