येते काही महिने भारतीय संघ आणि भारताचा भरोसेमंद कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 18 ते 22 जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
इंग्लंडच्या या दीर्घ दौर्यासाठी चेतेश्वर पुजारा जिममध्ये कठोर मेहनत घेत आहे. पुजाराने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर कसरतीचा व्हिडिओ शेअर केला होता. काही वेळातच पुजाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 5 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पुजारा प्रचंड घाम गाळताना दिसत आहे.
पुजाराने मागील ऑस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोक्याच्या क्षणी भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी केली होती. गाबा कसोटीच्या दुसऱ्या डावात पुजाराने केलेली अर्धशतकीय खेळी ही क्रिकेट पंडितांनी मागील काळातील सर्वोत्तम खेळींमध्ये गणली आहे. पुजाराने त्याखेळीत 211 चेंडूत 56 धावांची झुंजार खेळी केली होती.
इंग्लंड दौर्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाला मुंबईत 14 दिवसांसाठी कॉरंटाइन रहावे लागणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला अजून एक महिना शिल्लक असल्याने खेळाडूंकडे आपली फिटनेस सुधारण्याची मोठी संधी आहे. तसेच भारतीय संघाकडे न्यूझीलंड विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला घेण्याची संधीही भारतीय संघाला असेल.
https://www.facebook.com/watch/?v=920248905433703
दरम्यान पुजाराच्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली असता, त्याला भारताची न्यू वॉल का म्हणतात हे स्पष्टपणे जाणवते. पुजाराने आतापर्यंत खेळलेल्या 85 कसोटी सामन्यात 46.59 च्या सरासरीने 6224 धावा केलेल्या आहेत.यादरम्यान त्याने 29 अर्धशतके तर 18 शतके झळकावली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात देखील सर्व भारतीय समर्थकांना पुजाराकडून अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! इंग्लंडनंतर भारतीय महिला संघ जाणार ‘या’ देशाच्या दौऱ्यावर, जय शहा यांनी केली घोषणा
‘तो नेहमी मला स्वातंत्र्य देत असतो,’ अव्वल भारतीय गोलंदाजाने रोहितच्या नेतृत्त्वाचे गायले गुणगान