भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात ३ सामन्यांची कसोटी आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून कसून सरावालाही लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेची मैदाने वेगवान गोलंदाजीस पोषक असल्याने उभय संघातील वेगवान गोलंदाज या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. त्यातही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार (Dean Elgar) याला भारताच्या ताफ्यातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या भेदक माऱ्याची भीती वाटते आहे.
वर्ष २०१८ नंतर भारताची ही दक्षिण आफ्रिकेत पहिलीच कसोटी मालिका असेल. मागील कसोटी मालिकेत शानदार प्रदर्शनानंतरही भारतीय संघाला १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातही त्यावेळी दक्षिण आफ्रिका संघात एबी डिविलियर्स, डेल स्टेन, फाफ डू प्लेसिस, हाशिम आमला आणि वर्नोन फिलेंडर यांच्यासारखे अनुभवी खेळाडू उपलब्ध होते. परंतु वर्तमान दक्षिण आफ्रिका संघात यापैकी कोणता खेळाडू नाहीये.
त्यावेळी अशा दिग्गज फलंदाजांचा भरणा असतानाही आपली पदार्पणाची कसोटी मालिका खेळत असलेल्या बुमराहने घातक गोलंदाजी केली होती. त्याने या मालिकेतील ३ सामन्यांंमध्ये १४ विकेट्स काढल्या होत्या. आता तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. याबरोबरच परदेशी परिस्थितीत भारताचे गोलंदाजी आक्रमणही खूप सुधारले आहे. त्यामुळे बुमराह कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खतरनाक गोलंदाज ( Toughest Bowler Against South Africa) सिद्ध होऊ शकतो, असे एल्गारचे म्हणणे आहे.
एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत एल्गारने बुमराहविषयी प्रतिक्रिया दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणाला की, “बुमराह हा विश्वस्तरीय गोलंदाज आहे. जर कोणी एक गोलंदाज आहे, जो दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितींचा चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो. तर तो बुमराहच असेल. पण आम्ही एकाच खेळाडूवर पूर्ण लक्ष केंद्रित करत नाही. भारत हा एक मजबूत संघ आहे. त्यांनी मागील २-३ वर्षांपासून त्यांच्या प्रदर्शनात भरपूर सुधारणा केल्या आहेत. त्यांचे परदेशातील प्रदर्शनही खूप उल्लेखनीय राहिले आहे.”
पुढे फिरकी गोलंदाज आर अश्विनविषयीही एल्गारने आपले मत मांडले आहे. एल्गार म्हणाला की, “परदेशी दौऱ्यावर भारतीय गोलंदाजीत खूप सुधारणा झाल्या आहेत. आम्ही ज्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध खेळणार आहोत, त्यांच्याविरुद्ध खूप सावधानीने खेळावे लागणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारा-रहाणेला जुन्या रंगात आणण्यासाठी महागुरूने घेतली धोनीच्या ‘शागीर्द’ची मदत, व्हिडिओ व्हायरल
भारतीय क्रिकेटमध्ये फुटले वादांचे पेव: आता अश्विन-शास्त्री आमने-सामने; वाचा पूर्ण प्रकरण
विनोद कांबळीने निवडले फॅब फोर; विराट वगळता सर्वच नावे चकित करणारी