डेक्कन ग्लॅडिएटर्सने अबूधाबी टी१० लीग २०२१ वर कब्जा केला आहे. आंद्रे रसेल आणि टॉम कॅडमोर यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर डेक्कन संघाने १० षटकांत १५९ धावांची नाबाद भागीदारी करून दिल्ली बुल्सला सामन्यातून बाहेर काढले. एवढ्या मोठ्या लक्ष्यासमोर ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखालील संघाने गुडघे टेकले. डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या विजयाचा नायक आंद्रे रसेल ठरला. त्याने ३२ चेंडूत नाबाद ९० धावा केल्या. रसेलने आपल्या वादळी खेळीत ७ षटकार आणि ९ चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राइक रेट २८० पेक्षा जास्त होता. आंद्रे रसेलशिवाय कॅडमोरनेही २८ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या.
गोलंदाजांची शानदार कामगिरी
डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या १६० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दिल्ली बुल्सला केवळ १०३ धावा करता आल्या आणि त्यांनी ५६ धावांनी सामना गमावला. दिल्ली बुल्सकडून चंद्रपॉल हेमराजने ४२ धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाज अंतिम फेरीत फ्लॉप ठरला. त्याला १४ धावा करता आल्या. डॉमिनिक ड्रेक्स आणि कर्णधार ड्वेन ब्राव्हो यांना खातेही उघडता आले नाही. ग्लॅडिएटर्ससाठी डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सने २ षटकात केवळ ४ धावा देत २ बळी घेतले. मिल्सच्या गोलंदाजीने दिल्ली बुल्सला विजेतेपदापासून दूर नेले.
अंतिम सामन्यात दिल्ली बुल्सचा कर्णधार ड्वेन ब्राव्होने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला. कारण, कॅडमोर आणि रसेल या जोडीने येताच दिल्लीच्या गोलंदाजांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. रसेल आणि कॅडमोर या जोडीने ४.१ षटकात संघाची धावसंख्या ५० धावांपर्यंत पोहोचवली. रसेलने अवघ्या १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रसेलने स्पर्धेत प्रथमच अर्धशतक झळकावले. मात्र, यानंतरही रसेल थांबला नाही आणि फलंदाजी करताना त्याने सातव्या षटकातच संघाची धावसंख्या १०० पार नेली.
शेवटच्या तीन षटकात ५८ धावा
डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या फलंदाजांनी शेवटच्या ३ षटकात ५८ धावा केल्या. शेफर्डच्या षटकात रसेल आणि कॅडमोर यांनी २१ धावा केल्या. रामपॉलने नवव्या षटकात २३ धावा दिल्या. या षटकात २ षटकार आणि २ चौकारही मारले गेले. दहाव्या षटकात ड्वेन ब्राव्होने १४ धावा दिल्याने ग्लॅडिएटर्सची धावसंख्या १५९ पर्यंत मर्यादित राहिली. रसेल अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. तर, स्पर्धेचा मानकरी पुरस्कार वानिंदु हसरंगा याला देण्यात आला.