सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील आतापर्यंतच्या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. भारतीय संघाने लॉर्ड्सवरील, तर इंग्लंडने लीड्सवरील कसोटी सामना जिंकून मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. आता पुढील २ कसोटी सामने दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.
असे असले तरी, भारतीय संघासाठी एक अडचणीची बाब ठरली आहे, ती म्हणजे भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाज विभाग. गेल्या काही काळापासून पुजारा, रहाणेसहीत कर्णधार कोहली हे खराब फॉर्मशी झगडत आहेत. आता त्यात आणखी एक नाव जोडले गेले ते म्हणजे रिषभ पंत.
भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत या इंग्लंड दौऱ्यात आपली कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताने पंतला एक सल्ला दिला आहे. मागील तिनही कसोटी सामन्यात पंतची खेळी अत्यंत असमाधानकारक राहिली. यातील ५ डावांमध्ये पंतने केवळ ८७ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सरासरी केवळ १७.४० इतकीच आहे. त्यामुळे पंत देखील आता चाहत्यांच्या रडारवर आला आहे.
अशात टाइम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना दिप दासगुप्ताने पंतच्या खराब फॉर्मबाबत वक्तव्य करत सल्ला दिला आहे. ज्यात तो म्हणाला, “पंतने मैदानात एकदा सेट झाल्यावर आपला नैसर्गिक खेळ खेळायला हवा. त्याने त्याच्या विचार प्रक्रियेत अजिबात गडबड करू नये. एका डावात पंतने जर चांगली खेळी केली. तर तो सामना जिंकवू देखील शकतो. त्यामुळे त्याला संधी दिली पाहिजे. मात्र पंतने सध्या तरी, त्याच्या शॉट निवडीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. याबाबत त्याने सतर्कतेने आपला शॉट निवडावा.”
“जेम्स अँडरसन आणि ओली रोबिन्सन अशा परिस्थितीचा चांगलाच फायदा घेतात. ज्यामुळे त्यांना हे चांगलेच माहित आहे की, पंतला कसे बाद करायचे? सुरुवातीला जर पंतने यांना खेळून काढले, तर तो त्याचा नैसर्गिक खेळ खेळू शकतो,” असेही दासगुप्ता म्हणाला.
दरम्यान, तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघातील बदलांबाबत देखील मोठे संकेत दिले होते. तसेच इंग्लंडचा उपकर्णधार जोस बटलरने देखील वैयक्तिक कारण देत मालिकेतून माघार घेतली आहे. त्याऐवजी इंग्लंडने सॅम बिलिंग्जला संघात सामील केले आहे. अशात पुढील कसोटी सामन्यात दोन्ही संघात अंतिम ११ मध्ये बदल झालेले दिसून शकतात.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानात गुरुवार (२ ऑगस्ट) पासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–टेस्ट सिरीजमध्ये आघाडी घेण्यासाठी भिडणार भारत-इंग्लंड, कधी आणि कुठे होईल चौथी कसोटी; जाणून घ्या सर्वकाही
–कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा यष्टीरक्षक, ज्याच्या साधे २० सामनेही नाहीत आले नशीबी
–यष्टीमागे अन् यष्टीपुढेही यांचा धाक! क्रिकेटविश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारे ४ विकेटकीपर