जुलै महिन्यात भारतीय मर्यादीत षटकांच्या संघाने श्रीलंका दौरा केला होता. या दौऱ्यात वनडे मालिकेत भारताने २-१ अशा फरकाने विजय मिळवला होता. या मालिकेतील दुसरा सामना भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या फलंदाजीमुळे अनेकांच्या लक्षात राहिला. आता त्याने त्याच्या खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
त्या सामन्यात भारतीय संघाने २७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १९३ धावांवर ७ गडी गमावले होते. अशा बिकट परिस्थितीत दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी धैर्य न सोडता भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. दीपक चाहरने या सामन्यात नाबाद ६९ धावांची खेळी केली होती. त्याने भुवनेश्वर कुमारबरोबर(१९*) नाबाद ८४ धावांची भागीदारी केली होती. त्याच्या कामगिरीमुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्कारही देण्यात आला होता.
चाहर सध्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यासाठी चेन्नई सुपर किंग्ससह दुबईमध्ये आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१ हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या अर्धशतकी खेळीबद्दल त्याने सीएसकेशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
तो म्हणाला, ‘अखेर मला एका सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती आणि मी त्याचा फायदा घेतला. जेव्हा मी पॅड घालून बसलो होतो, तेव्हा मी पाहिले की विकेट जात आहे आणि आता मला फलंदाजीला जायचे आहे. मी त्यावेळी सामना जिंकण्याचा विचार केला नव्हता, माझा फक्त एवढाच विचार होता की सर्व षटकं फलंदाजी करायची, ज्यामुळे आम्ही लक्ष्याच्या जवळ जाऊ शकतो. जेव्हा आपण लक्ष्याच्या जवळ असतो, तेव्हा काहीही होऊ शकते.’
चेन्नईचा २९ वर्षी गोलंदाज चाहर पुढे म्हणाला, ‘मी खूप बचावात्मक सुरुवात केली. मला आठवतंय की मी काही उसळत्या चेंजूवर बचावात्मक खेळलो होतो. त्या विशिष्ट सामन्यात, जी परिस्थिती होती, त्यानुसार मी खेळत होतो. मी त्या संघातील कमजोर गोलंदाजाविरुद्ध धोका पत्करत होतो. हसरंगा आणि चमिरा चांगली गोलंदाजी करत होते. त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध फक्त चेंडू खेळून काढत होतो आणि अन्य गोलंदाजांना निशाणा बनवत होतो.’
‘प्रत्येक षटकानंतर मी धावफलकाकडे पाहायचो, किती चेंडू राहिलेत, किती धावा राहिल्यात आणि मला धोका पत्करण्याची गरज आहे का, पाहायचो. जेव्हा धावा चेंडूंच्याही पुढे गेल्या, तेव्हा मी काही चेंडूवर आक्रमण करण्यास सुरुवात केली.’
त्या खेळीबरोबरच चाहरने त्या सामन्यात २ विकेट्सही घेतल्या होत्या. त्या सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने चाहरला एक संदेशही पाठवला होता. याबद्दलही चाहरने खुलासा केला आहे. तो म्हणाला, ‘त्या खेळीनंतर धोनीने मला माझ्या फलंदाजीबद्दल संदेश पाठवला होता. त्याने लिहिले होते, ‘खूप चांगला खेळलास’. त्यामुळे माझ्यासाठी तो खूप छान क्षण होता.’
पुढे चाहरने सांगितले की धोनीने त्याला त्याच्या फलंदाजीसाठीच निवडले होते. तो म्हणाला, ‘त्याने मला संघात माझ्या फलंदाजीसाठीच निवडले होते. जेव्हा मी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळत होतो, तेव्हा मला फलंदाजी अष्टपैलू म्हणूनच निवडले गेले होते. २०१८ मध्ये, त्याने एका सामन्यात त्याच्याआधी मला फलंदाजीसाठी पाठवले होते. त्या सामन्यात मी ४० च्या आसपास धावा केल्या होत्या. त्यानंतर मला फारशी संधी मिळाली नाही, त्यामुळे मी माझ्या संधीची वाट पाहात होतो.’
Nyabagam Varugiradha?
Chahar Ta(l)kes us through the Lankan moments!
Full 🎥: https://t.co/zhRUq1W4Zt#WhistlePodu #Yellove 🦁💛 @deepak_chahar9 pic.twitter.com/XyJR36nmiN— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 11, 2021
आयपीएल २०२१ हंगामातील दुसऱ्या टप्प्याचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात १९ सप्टेंबर रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पलटन, किती मोदक खाल्ले आत्ता पर्यंत?’, मुंबई इंडियन्सने शेअर केला खेळाडूंचा मजेशीर व्हिडिओ
तब्बल १८ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर न्यूझीलंड खेळणार पाकिस्तानात
आयपीएल सुरू होण्याआधीच सीएसकेला मोठा धक्का, प्रमुख फलंदाज झाला दुखापतग्रस्त