आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपक चाहरने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने पावरप्लेच्या षटकात उत्कृष्ट गोलंदाजी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या कामगिरीचे त्याला लवकरच फळ मिळू शकते. येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तिथे त्यांना 3 वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यासाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करेल. या दौऱ्यातून दीपक चाहरला दोन वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करण्याची उत्तम संधी आहे. त्याने शेवटचा सामना २०१९ मध्ये खेळला होता.
वनडे संघात करू शकतो पुनरागमन
दीपक चाहरला भारतीय टी-२० संघात खेळण्याची संधी मिळत आहे. परंतु त्याने शेवटचा वनडे सामना २०१९ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करावी लागली आहे. त्याने २०१८ मध्ये आशिया चषक स्पर्धेत अफघानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात एमएस धोनी कर्णधार असताना वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हा धोनीचा कर्णधार म्हणून २०० वा वनडे सामना होता.
विशेष म्हणजे धोनीने जानेवारी २०१७ मध्येच भारतीय संघाच्या मर्यादित षटकांचे कर्णधारपद (Captaincy) सोडले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे(Virat Kohli) भारताची धूरा सोपवली होती. पण त्या एशिया कप स्पर्धेत विराटला विश्रांती देण्यात आली होती. तर या स्पर्धेतील भारताचे प्रभारी कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि प्रभारी उपकर्णधार शिखर धवन(Shikhar Dhawan) यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी विश्रांती घेतली होती. त्यामुळे धोनीने जवळजवळ दिडवर्षांनंतर पुन्हा एकदा अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचे कर्णधारपद सांभाळले होते.
त्यानंतर २०१९ मध्ये चाहरने शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्यामुळे आगामी श्रीलंका दौऱ्यावर त्याला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची उत्तम संधी आहे.
आयपीएल २०२१ स्पर्धेत चाहरची उत्कृष्ट कामगिरी
चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आयपीएल २०२१ स्पर्धेत दीपक चाहरने उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ७ सामने खेळले. यात त्याला ८ गडी बाद करण्यात यश आले होते. दीपक चाहरच्या कामगिरीचे एमएस धोनीने देखील तोंडभरून कौतुक केले होते .धोनीने म्हटले होते की, “दीपक चाहरने गेल्या काही वर्षात संघासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.”
जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ जाणार श्रीलंकेत
ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होईल. ५ जुलैला भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होईल तर २८ जुलैला परतीचा प्रवास करेल.
असा असू शकतो श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघ
पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनीष पांडे, ऋतुराज गायकवाड़, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि राहुल चाहर.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेले ११ भारतीय, आज असतात तरी कुठे?
दहा वर्षांनंतर इयान बेलने ‘त्या’ विवादीत रनआउटबद्दल सोडले मौन; म्हणाला, “माझीच चूक होती, मी…”