आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ४ धावा राखून विजय मिळवला आणि मालिका २-० ने खिशात घातली. भारतीय संघाला हा सामना जिंकून देण्यात दीपक हुड्डा आणि संजू सॅमसन यांचा मोठा वाटा राहिला. त्या दोघांनी दणकेबाज खेळी करत दीडशतकी भागीदारी रचली आणि भारतीय संघाला २२५ धावांपर्यंत पोहोचवले. या भागीदारीसह हुड्डा – सॅमसनच्या जोडीने अद्भुत विक्रमही नावावर केले आहेत.
ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाल्याने संजू सॅमसनला (Sanju Samson) सलामीला संधी दिली गेली होती. मात्र सॅमसन आणि इशान किशनची सलामी जोडी अवघ्या १३ धावांवरच तुटली. इशान ५ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हुड्डाला (Deepak Hooda) सोबतीला घेत सॅमसनने जबरदस्त खेळ दाखवला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांनी प्रशंसनीय भागीदारी झाली. सॅमसन ४२ चेंडूत ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. तर हुड्डाने ५७ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ९ चौकार मारत १०४ धावांची शतकी खेळी केली.
या दोघांमध्ये झालेली १७६ धावांची भागीदारी ही टी२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून केली गेलेली सर्वोच्च भागीदारी आहे. हुड्डा आणि सॅमसनच्या (Deepak Hooda & Sanju Samson) जोडीने केएल राहुल आणि रोहित शर्मा या जोडीलाही मागे टाकले आहे. यापूर्वी भारताकडून टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारी राहुल आणि रोहित जोडीच्या नावावर होती. त्यांनी २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध १६५ धावांची भागीदारी रचली होती. परंतु आता हुड्डा आणि सॅमसनने त्यांचा विक्रम मोडला आहे.
टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोच्च भागीदारी
१७६ – दीपक हुडा आणि संजू सॅमसन विरुद्ध आयर्लंड, २०२२
१६५- केएल राहुल आणि रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, २०१७
१६०- शिखर धवन आणि रोहित शर्मा विरुद्ध आयर्लंड, २०१८
१५८- शिखर धवन आणि रोहित शर्मा विरुद्ध न्यूझीलंड, २०१७
१४०- केएल राहुल आणि रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, २०२१
जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही स्वरूपातील सर्वोच्च भागीदारींवर नजर टाकायची झाल्यास, भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये विनू मंडक आणि पंकज रॉय यांच्या नावावर सर्वोच्च भागीदारी आहे. १९५६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध मंकड आणि रॉय यांच्यात पहिल्या विकेटसाठी ४१३ धावांनी भागीदारी झाली होती. तर वनडे क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड या जोडीच्या नावावर सर्वोच्च भागीदारीचा विक्रम आहे. १९९९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सचिन आणि द्रविड यांच्यात ३३१ धावांची भागीदारी झाली होती. भारताकडून टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च भागीदारी हुड्डा आणि सॅमसन जोडीच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कहर योगायोग! भारतासाठी शतक करणारा शंभरावा क्रिकेटर बनला हुड्डा, पहिली सेंचूरी ‘या’ दिग्गजाच्या नावे
अफलातून! आजवर ११ हजार टी२० खेळल्या गेल्या, पण ‘ही’ अद्भुत कामगिरी करणारा भारतीय संघ पहिलाच
निर्विवाद वर्चस्व! भारताने शेवटच्या चेंडूवर जिंकला आयर्लंड विरूद्धचा शेवटचा सामना