महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम फेरीत तुल्यबळ, अतीतटीची, रोमहर्षक, चुरसीची अशा अनेक विशेषणानी पार पडली. निर्धारित वेळेच्या शेवटच्या ४ सेकंदतही अंतिम विजेता कोण याविषयी संभ्रम निर्माण करत ‘काटे की टक्कर’ देत लातूरचा शैलेश शेळके व सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांची लढत झाली. शिलेशने ज्ञानेश्वरवर ११-१० अशा अतीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळविला व किताबाच्या दावेदार शर्यतीत जागा निश्चित केली.
लढत करत नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी पुणे शहराचा अभिजीत काटकेला ५-२ गुणांनी पराजित केले. तोडीसतोड चपळ लढत देत अखेर हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीस सज्ज झाला.
उपांत्य फेऱ्यांमधील थरार
महाराष्ट्र केसरी खुला गटाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे व गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात चुरसीची लढत झाली. अपेक्षे प्रमाणे बाला रफिकने लीड घेतली होती. पण त्याला तोडीस तोड टक्कर देत माऊलीने एका मिनिटाच्या आत त्याला चितपट करून बाजी मारली व माती विभागातील अंतिम सामन्यात प्रवेश केला.
तसेच लातूरच्या शैलेश शेळकेने हिंगोलीच्या गणेश जगतापवर ६-४ गुण फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पुणे शहराचा अभिजीत कटके व लातूरचा सागर बिराजदार यांच्यात महाराष्ट्र केसरी गादी विभागासाठी चित्त थरारक तुल्यबळ लढत झाली. यात अभिजीतने सागरवर २-० गुणांनी विजय मिळवत गादी विभागातील अंतिम फेरीत प्रवेश केला. तर नाशिक जिल्हयाच्या हर्षवर्धन सदगीरने मुंबई उपनगरच्या सचिन येलवार ६-० ने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
आज होणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याबद्दल काही खास गोष्टी –
– आज दि 7 जानेवारी रोजी सायं 5 वाजता होणारी अंतिम लढत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.
– प्रेक्षकांना अंतिम लढतीचा आनंद घेता यावा यासाठी खास मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था
– वाहनांची व्यवस्था हाय वे वरील हाॅलिडे इन वरील मैदानावर करण्यात आली आहे.