पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत क्वालिफायर १ लढतीत प्रदीप दाढे(४-१२), कुणाल थोरात (३-२७)याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह दिव्यांग हिंगणेकर (५९धावा), अभिषेक पवार(नाबाद ४२) यांनी केलेल्या धावांच्या जोरावर गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २०षटकात ७बाद १५८धावा केल्या. सलामवीर मंदार भंडारी(१) ला रत्नागिरीच्या प्रदीप दाढेने झेल बाद करून नाशिक टायटन्स संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर अर्शिन कुलकर्णीने ३७ चेंडूत ५२ धावा काढून आपले अर्धशतक साजरे केले. त्याने ५चौकार व ३षटकार मारले. त्याला साहिल पारिखने २९चेंडूत ४चौकाराच्या मदतीने २५धावांची संयमी खेळी करून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३९चेंडूत ५०धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. रत्नागिरीच्या कुणाल थोरातने साहिल पारीखला त्रिफळा बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर याच षटकात कुणालने अथर्व काळे (१) ला देखील त्रिफळा करून नाशिक संघाला तिसरा धक्का दिला.
अर्शिनची खेळी कुणाल थोरातने झेल बाद करून ५२धावांवर संपुष्टात आणली. किरण चोरमलेने त्याचा अप्रतिम झेल टिपला. १४व्या षटकात पहिल्याच चेंडूवर प्रदीप दाढेने मुकेश चौधरीला झेल बाद करून खाते न उघडताच तंबूत परतवले. रणजीत निकम १८ धावांवर, कौशल तांबे(०) धावांवर झेल बाद झाला. प्रदीप दाढेने या दोघांना बाद केले. यावेळी नाशिक टायटन्स ७बाद १०५धावा असा अडचणीत होता. त्यानंतर धनराज शिंदेने १६चेंडूत नाबाद ३६ धावांची खेळी करून संघाची धावगती वाढवली. त्याने २चौकार व ३ षटकार ठोकले. त्याला दिग्विजय देशमुखने नाबाद १७धावा काढून साथ दिली.
१५८धावांचे आव्हान रत्नागिरी जेट्स संघाने १८.४षटकात ४बाद १६४ धावा करून पुर्ण केले.अझीम काझी व दिव्यांग हिंगणेकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८चेंडूत ७६धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. दिव्यांगने ३७चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्याने ८चौकार व २षटकार मारले. हे दोघेही बाद झाल्यावर अभिषेक पवार व किरण चोरमले यांनी चौथ्या विकेटसाठी ३५चेंडूत ५०धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. अभिषेक पवारने २७चेंडूत ४चौकार व २षटकारासह नाबाद ४२धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर निखिल नाईकने ५चेंडूत नाबाद ११ धावा काढून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
ईगल नाशिक टायटन्स: २०षटकात ७बाद १५८धावा(अर्शिन कुलकर्णी ५२(३७,५×४,३×६), धनराज शिंदे नाबाद ३६(१६,२×४,३×६), साहिल पारख २५, रणजीत निकम १८, दिग्विजय देशमुख नाबाद १७, प्रदीप दाढे ४-१२, कुणाल थोरात ३-२७) पराभुत वि. रत्नागिरी जेट्स: १८.४षटकात ४बाद १६४धावा(दिव्यांग हिंगणेकर ५९((३७,८×४,२×६), अभिषेक पवार नाबाद ४२(२८,४×४,२×६), किरण चोरमले २९(२४), निखिल नाईक नाबाद ११, मुकेश चौधरी २-४६, प्रशांत सोळंकी १-२०); सामनावीर – कुणाल थोरात.