आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 वर दिल्लीतील वायू प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील धोकादायक वायू प्रदूषणामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने शनिवारी (4 नोव्हेंबर) अरुण जेटली स्टेडियममधील सराव सत्र रद्द केले आहे. याआधी शुक्रवारी (3 नोव्हेंबर) संध्याकाळी बांगलादेशनेही याच कारणास्तव त्यांचे सराव सत्र रद्द केले होते. श्रीलंकेला सोमवारी (6 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी तयारी करण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला शनिवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 2 ते 5 या वेळेत सराव करायचा होता.
दिल्ली गेल्या काही दिवसांपासून धोकादायक वायू प्रदूषणाचा सामना करत आहे. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 400 च्या वर गेला आहे. त्यामुळे दिल्लीच्या हवेत श्वास घेणेही कठीण झाले आहे. संपूर्ण दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलली आहे. हे पाहून श्रीलंकन संघाच्या खेळाडूंनी सराव सत्र रद्द केले. आजकाल भारतातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, दिल्लीच्या खराब हवामानावर श्रीलंका आणि बांगलादेशने नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी बांगलादेश क्रिकेट संघ अरुण जेटली स्टेडियमवर सराव सत्रात सहभागी होणार होता, परंतु उच्च वायू प्रदूषणामुळे संघ व्यवस्थापनाने आपला निर्णय बदलला. शुक्रवारी दिल्लीची एक्यूआय पातळी अत्यंत वाईट पातळीवर पोहोचली होती. बांगलादेश संघाचे संचालक खालिद महमूद यांनी हॉटेलमध्ये सांगितले होते की, “आम्ही आज सराव रद्द सत्र केले होते, परंतु कालपासून हवेची गुणवत्ता खूपच खराब आहे त्यामुळे आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही. आमच्या काही खेळाडूंना खोकला आल्याची तक्रार आहे.”
विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंका संघाने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत त्यातील फक्त दोन सामने त्यांना जिंकता आले आहेत. तर दुसरीकडे बांगलादेश संघानेही या विश्वचषकात 7 सामने खेळले आहेत आणि त्यांना एकच सामना जिंकता आला आहे. (Air pollution threat to World Cup 2023 practice session of Sri Lanka canceled after Bangladesh)
म्हत्वाच्या बातम्या
ऑस्ट्रेलियावर भारी पडले इंग्लंडचे गोलंदाज, षटके संपण्याआधी संघ सर्वबाद, फक्त एकाचे अर्धशतक
WC 2023 । श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी, बोर्डाच्या सचिवांचा राजीनामा, जाणून घ्या कारण