क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने गुरूवारी (११ जून) संघ जाहीर केला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने दिल्लीत जन्मलेल्या फिरकीपटूचा संघात समावेश केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात निखिल चौधरीची निवड करण्यात आली आहे. त्याला ट्रेव्हिस हेडच्या जागी संघात जागा मिळाली आहे.
निखिल अजून ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला नाही, मात्र या ३० वर्षीय खेळाडूने होबार्ट हरिकेन्सकडून बिग बॅश टी२० लीगमध्ये खेळून देशांतर्गत स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच तो आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचाही भाग राहिला आहे. जर त्याची बांगलादेशविरुद्धच्या सामन्यांसाठी अंतिम अकरामध्ये निवड झाली, तर तो ६० हून अधिक वर्षांत ऑस्ट्रेलियासाठी खेळणारा ‘भारतात जन्मलेला’ पहिला पुरुष खेळाडू ठरू शकतो.
निखिलने २०१७-१९ या काळात पंजाबसाठी १४ सामने खेळले; यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील १२ टी२० सामन्यांचा आणि विजय हजारे ट्रॉफीतील दोन ‘लिस्ट ए’ सामन्यांचा समावेश होता.
निखिलचा जन्म ४ मे, १९९६ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्याची या हंगामातील बीबीएलमधील कामगिरी पाहून निवडकर्त्यांनी त्याची राष्ट्रीय संघात निवड केली. “निखिल काही काळापासून राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा खेळाडू आहे. तो या दौऱ्यासाठी राखीव खेळाडू होता, ब्रिस्बेनमधील प्री-सीझन कॅम्पमध्ये तो संघात सामील झाला होता आणि त्याची ट्रेव्हिस हेडच्या जागी निवड झाली आहे,” असे ऑस्ट्रेलियाचे निवडकर्ता टोनी डोडमाइड म्हणाले आहेत.
ही टी२० मालिका १७ जूनपासून सुरू होणार आहे. यामधील दुसरा सामना १९ जून आणि तिसरा सामना २१ जून रोजी खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने चट्टोग्राम येथे खेळण्याचे आयोजित केले आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिशेल मार्श करणार आहे.
सध्या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. त्यातील पहिला सामना यजमानांनी जिंकला आहे. त्यामुळे बांगलादेशने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ- मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, निखिल चौधरी, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, जोएल डेव्हिस, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मॅथ्यू कुहनेमन, रायली मेरेडिथ, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, ॲडम झाम्पा





