क्रिकेटजगतातील सर्वात मोठ्या आणि जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहसा फलंदाजांचा धाक पाहायला मिळाला आहे. पण गोलंदाजांनीही फलंदाजांना त्यांच्या चेंडूच्या तालावर नाचवण्याची संधी सोडलेली नाही. आयपीएल २०२०च्या हंगामातही कित्येक गोलंदाजांनी विरुद्ध संघांना ‘सळो की पळो’ करुन सोडताना आपण पाहिले आहे.
श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील गोलंदाजांनी या हंगामात जबरदस्त कामगिरी केली. कागिसो रबाडा आणि एन्रिच नॉर्किए यांच्या वेगापुढे कित्येक फलंदाज गपगार झाले आहेत. त्यांच्या सहयोगामुळेच दिल्लीने पहिल्यांदाच अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
या लेखात आम्ही, आयपीएल २०२०च्या पूर्ण हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केलेल्या पाच खेळाडूंचा आढावा घेतला आहे.
आयपीएल २०२०मधील दिल्ली कॅपिटल्सचे पाच सर्वोत्तम गोलंदाज –
१) कागिसो रबाडा –
दिल्ली कॅपिटल्सचा हुकमी गोलंदाज कागिसो रबाडाने यावर्षी कित्येक सामन्यात संघाला एकहाती विजय मिळवून दिले आहेत. या वेगवान गोलंदाजाने पूर्ण हंगामातील त्याच्या शानदार प्रदर्शनाने पर्पल कॅप स्वत:कडे कायम ठेवली आहे. त्याने आतापर्यंत या हंगामात १६ सामने खेळले असून एकूण २९ विकेट्स घेतल्या आहेत. यासह तो केवळ दिल्लीकडून नव्हे तर पूर्ण आयपीएल २०२०मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.
२) एन्रिच नॉर्किए –
दक्षिण आफ्रिकाच्या २६ वर्षीय एन्रिच नॉर्किएच्या वेगवान गोलंदाजीपुढे मोठ-मोठ्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. त्याने या हंगामातील राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या साखळी फेरी सामन्यात ताशी १५६.२२ किमी वेगाने चेंडू टाकला होता. हा आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज चेंडू ठरला. एवढेच नव्हे तर, नॉर्किएने त्याच सामन्यात सलग ४ चेंडू १५० किमी दर ताशी वेगाच्या आसपास टाकले होते. यासह आयपीएलमधील ३ सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम त्याने नावावर करत, सर्वांना चकित केले.
नॉर्किएने या हंगामात एकूण १५ सामने खेळले असून त्यात २० विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ८.३४ इतका राहिला आहे. यासह तो दिल्लीकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
३) आर अश्विन –
युवा खेळाडूंची भरमार असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने लिलावात अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन या अनुभवी खेळाडूंना ताफ्यात दाखल केले होते. या दोन्ही खेळाडूंनी दिल्लीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यातही अश्विन दिल्लीकडून या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. या फिरकीपटूने आतापर्यंत १४ सामने खेळले असून ७.७२च्या इकोनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याने २९ धावावंर ३ विकेट्स घेण्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
४) मार्कस स्टॉयनिस –
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस हा दिल्ली कॅपिटल्ससाठी मॅच विनर खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२०च्या लिलावात दिल्लीने स्टॉयनिसला ४.८० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत १६ सामने खेळले असून एकूण १२ विकेट्स घेतल्या आहेत. यात क्वालिफायर २ सामन्यात त्याने २६ धावांवर घेतलेल्या ३ विकेट्सचाही समावेश आहे.
५) अक्षर पटेल –
भारताचा गोलंदाजी अष्टपैलू अक्षर पटेल गतवर्षीपासून दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करत आहे. या हंगामात त्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे. आतापर्यंतच्या १३ सामन्यात त्याने ९ फलंदाजांना पव्हेलियनला रवाना केले आहे. दरम्यान त्याने १८ धावा देत २ विकेट्स घेण्याचाही पराक्रम केला आहे.
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020 FINAL : मुंबई पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणार का दिल्ली पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
FINAL : स्म्रीती मंधानाची फलंदाजी पडली सुपरनोवाजवर भारी, पहिल्यांदाच पटकावली ट्रॉफी
‘फायनलमध्ये न पोहोचणे लज्जास्पद’, हैदराबादच्या शिलेदाराने व्यक्त केल्या भावना