---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सने रचला इतिहास! आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच टीम…

On: मंगळवार, मे 12, 2026 11:15 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी रात्री पंजाब किंग्सला मोठा धक्का देत आयपीएल 2026 मधील प्लेऑफच्या शर्यतीत स्वतःच्या आशा जिवंत ठेवल्या. धर्मशालातील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्लीने 211 धावांचे प्रचंड लक्ष्य सहा चेंडू राखून गाठत तीन विकेट्सने थरारक विजय मिळवला.

या विजयासह दिल्ली कॅपिटल्सने इतिहास रचला. आयपीएलमध्ये धर्मशालामध्ये 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करणारा दिल्ली हा पहिलाच संघ ठरला. याआधी येथे सर्वात मोठा रन चेज 193 धावांचा होता, जो चेन्नई सुपर किंग्सने 2010 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध पूर्ण केला होता. तसेच हा आयपीएल इतिहासातील दिल्ली कॅपिटल्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा यशस्वी रन चेज ठरला आहे.

दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. मात्र कर्णधार अक्षर पटेल आणि डेविड मिलर यांनी डाव सावरत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. अक्षर पटेलने अवघ्या 30 चेंडूत 56 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर मिलरनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले. दोघांनी मिळून 64 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. अखेरीस आशुतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी संयमी फलंदाजी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

याआधी पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावत 210 धावा केल्या होत्या. सलामीवीर प्रियांश आर्यने 33 चेंडूत 56 धावांची वेगवान खेळी केली. तसेच श्रेयस अय्यर आणि कूपर कॉनॉली यांनी 83 धावांची भागीदारी करत पंजाबला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सचे 12 सामन्यांत 10 गुण झाले असून संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध विजय मिळवल्यास संघ 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो.

मात्र केवळ विजय पुरेसा ठरणार नाही. दिल्लीचा नेट रनरेट सध्या -0.993 इतका खराब आहे. त्यामुळे मोठ्या फरकाने विजय मिळवणे संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्ससारख्या संघांनीही उर्वरित सामन्यांत गुण गमावणे दिल्लीसाठी गरजेचे आहे. आता येथून पुढे एकही पराभव दिल्लीच्या प्लेऑफच्या आशांवर पूर्णविराम ठरू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---