क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात उत्तमोत्तम प्रदर्शन करणारा संघच पुढे जातो. अगदी २० षटकांच्या इंडियन प्रीमियर लीगलाही ही गोष्ट लागू होते. जर केवळ फलंदाजांविषयी बोलायचे झाले तर, आयपीएलमध्ये एकाहून एक धडाकेबाज फलंदाजांची भरमार आहे. कायरन पोलार्ड, ख्रिस गेल, हार्दिक पंड्या, एबी डिविलियर्स अशा कित्येक फलंदाजांपुढे भल्या भल्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळते. या यादीत, युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या फलंदाजांचाही क्रमांक लागतो.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील या संघाने नेत्रदिपक प्रदर्शन केले आहे. साखळी फेरीतील चढ-उतारांचा सामना करत शेवटी त्यांनी प्लेऑफमध्ये मजल मारली. एवढेच नव्हे तर, प्लेऑफमधील क्वालिफायर सामन्यांची सीमारेषा ओलांडत त्यांनी अंतिम सामनाही गाठला आहे. दिल्लीच्या या यशामध्ये संघातील गोलंदाजांबरोबरच उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या फलंदाजांचाही समावेश आहे.
या लेखात आम्ही, आयपीएल २०२०च्या पूर्ण हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून सर्वोत्कृष्ट फलंदाजी केलेल्या पाच खेळाडूंचा आढावा घेतला आहे.
आयपीएल २०२०मधील दिल्ली कॅपिटल्सचे पाच सर्वोत्तम फलंदाज –
१) शिखर धवन –
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने पूर्ण हंगामात कमालीचे प्रदर्शन केले आहे. त्याच्या बॅटमधून एका मागोमाग एक सलग दोन शतके निघाली. यासह आयपीएलच्या इतिहासात सलग २ शतके लगावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. एवढेच नव्हे तर, त्याने प्लेऑफमधील सामन्यातही मॅच विनिंग खेळी करत संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
धवनने पूर्ण हंगामात एकूण १६ सामने खेळले असून ६०३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ शतकांसह ४ अर्धशतकांचाही समावेश आहे. यासह तो दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा अव्वल क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. तर सर्व संघांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
२) श्रेयस अय्यर –
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघाचे उत्कृष्टपणे नेतृत्त्व करण्याबरोबरच फलंदाजीतही जलवा दाखवला आहे. त्याने पूर्ण हंगामात १६ सामने खेळले असून ३०.२६च्या सरासरीने ४५४ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८८ धावा इतकी राहिली आहे. साखळी फेरीतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता.
३) मार्कस स्टॉयनिस –
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस हा दिल्ली कॅपिटल्ससाठी मॅच विनर खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२०च्या लिलावात दिल्लीने स्टॉयनिसला ४.८० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने दिल्लीच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत या हंगामाची दणक्यात सुरुवात केली होती. पुढे अजून २ अर्धशतक खात्यात जमा करत त्याने १६ सामन्यात ३५२ धावा केल्या आहेत.
४) रिषभ पंत –
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत २०१६ पासून दिल्ली कॅपिटल्स संघाच प्रतिनिधित्त्व करत आहे. त्याची गेल्या २ वर्षांतील आकडेवारी नावाजण्याजोगी आहे. परंतु, यंदा मात्र हा खेळाडू त्याच्या खराब फिटनेसमुळे लौकिसास साजेशी कामगिरी करु शकला नाही. तरीही त्याची आकडेवारी समाधानकारक आहे. त्याने आयपीएलच्या तेराव्या हंगामात १३ सामने खेळले असून २८.७०च्या सरासरीने २३७ धावा केल्या आहेत.
५) पृथ्वी शॉ –
दिल्ली कॅपिटल्सचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला त्याच्या सुमार फलंदाजीमुळे टिकाकारांचा सामना करावा लागला. परंतु, या फलंदाजाने हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यात केलेली आक्रमक फलंदाजी विसरुन चालणार नाही. शॉ याने आयपीएल २०२०मध्ये एकूण १३ सामने खेळले असून २२८ धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने सर्वाधिक वैयक्तिक ६६ धावा केल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या साखळी फेरी सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता.
ट्रेंडिंग लेख-
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2020 FINAL : मुंबई पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणार का दिल्ली पहिल्या विजेतेपदाचे स्वप्न साकारणार?
FINAL : स्म्रीती मंधानाची फलंदाजी पडली सुपरनोवाजवर भारी, पहिल्यांदाच पटकावली ट्रॉफी
‘फायनलमध्ये न पोहोचणे लज्जास्पद’, हैदराबादच्या शिलेदाराने व्यक्त केल्या भावना