आयपीएलच्या 2020 हंगामातील 16 व्या सामन्यात दोन वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्ली कॅपिटल्स संघाने पराभव केला. या सामन्यात केकेआरचा सलामीवीर सुनील नरेनला फलंदाजीत काही खास कामगिरी करता आली नाही. यापूर्वी खेळलेल्या तीनही सामन्यात त्याने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे नरेनच्या भूमिकेविषयी प्रशिक्षकाशी चर्चा करावी लागेल, असे केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने सांगितले.
शारजाहच्या छोट्या मैदानावर दिल्लीच्या कॅपिटल्सने 4 गडी गमावून 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआर संघ 8 बाद 210 धावाच करू शकला. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने 38 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या फलंदाजांचे कौतुक करताना म्हणाला, “त्यांनी खेळलेल्या खेळीचा मला अभिमान आहे. फलंदाजांनी शेवटपर्यंत हार मानली नाही. हिच या संघाची गुणवत्ता आहे. जर आणखी दोन षटकार लागले असते तर आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “आतापर्यंत डावाची चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरलेल्या सुनील नरेनच्या भूमिकेबद्दल प्रशिक्षकाशी चर्चा करावी लागेल. मला त्याच्यावर विश्वास आहे; पण आम्हाला अष्टपैलू आंद्रे रसल याला फलंदाजीसाठी अधिक संधी द्यायची आहे.”
नरेनने यंदाच्या आयपीएल हंगामात 4 सामन्यात केवळ 27 धावा केल्या आहेत.