रविवारी (१० एप्रिल) आयपीएल २०२२चा चौथा डबल हेडर खेळला गेला. यातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात दिल्लीचा संघ त्यांची गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्नशील दिसला. तर कोलकात्याचा संघ त्यांचा विजयरथ कायम ठेवण्यासाठी झगडताना दिसला. अखेर दिल्लीने ४४ धावांनी हा सामना जिंकत हंगामात शानदार पुनरागमन केले आहे. हा त्यांचा दुसराच विजय आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित २० षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या. दिल्लीच्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ १९.४ षटकांमध्येच १७१ धावांवर सर्वबाद झाला.
श्रेयस अय्यरची झुंज व्यर्थ
दिल्लीच्या २१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताकडून एकट्या कर्णधार श्रेयस अय्यरने चिवट झुंज दिली. त्याने ३३ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ५ चौकारही मारले. तसेच नितीश राणानेही ३० धावांचे योगदान दिले होते. परंतु कोलकाताचे इतर फलंदाज सपशेल फेल ठरल्यामुळे संघ १७१ धावांवरच सर्वबाद झाला.
या डावात दिल्लीकडून कुलदीप यादव आणि खलील अहमद यांनी शानदार गोलंदाजी केली. कुलदीपने ४ षटके गोलंदाजी करताना ३५ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहदमनेही ३ विकेट्स घेतल्या व शार्दुल ठाकूरनेही २ फलंदाजांना बाद केले.
वॉर्नर आणि पृथ्वी शॉच्या महत्त्वपूर्ण खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून त्यांच्या सलामी जोडीने शानदार फटकेबाजी केली. पृथ्वी शॉने २९ चेंडूंमध्ये १७५ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करताना ५१ धावा केल्या. त्याने या खेळीदरम्यान २ षटकार आणि ७ चौकार मारले. तर वॉर्नरने ४५ चेंडू खेळताना २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ६१ धावांची कडकडीत अर्धशतकी खेळी केली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची शानदार भागीदारीही झाली.
या सलामी जोडीव्यतिरिक्त कर्णधार रिषभ पंतने झटपट २७ धावा जोडल्या. तर अष्टपैलू अक्षर पटेल (नाबाद २२ धावा) आणि शार्दुल ठाकूर (नाबाद २९ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी केल्या होत्या.
या डावात कोलकाताकडून सुनिल नारायण याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या होत्या. तर आंद्रे रसेल, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
RR vs LSG: लखनऊचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; दोन्ही संघात २ महत्त्वाचे बदल
रेकॉर्ड अलर्ट! आयपीएलचा टॉपचा ‘अर्धशतकवीर’ बनला डेविड वॉर्नर, रोहित- विराट जवळपासही नाहीत
हैदराबादच्या पहिल्या विजयानंतरही संतुष्ट नाही विलियम्सन; म्हणाला, ‘या’ गोष्टीवर आता करावे लागेल फोकस





