इंडियन प्रिमीयर लीगच्या १४ व्या हंगामातील ५० वा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सोमवारी (४ ऑक्टोबर) खेळवला गेला. चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर ३ गाड्यांनी विजय मिळवत गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. हा विजय दिल्ली संघाचा कर्णधार रिषभ पंतसाठी खास ठरला आहे. कारण एका खास दिवशी दिल्ली संघाने चेन्नईवर विजय प्राप्त केला आहे.
चेन्नई संघावरचा विजय रिषभसाठी खास ठरला कारण, आज त्याचा सोमवारी (४ ऑक्टोबर) २४ वा वाढदिवस होता. वाढदिवशीच त्याच्या संघाने विजय मिळवून त्यास खास भेट दिली आहे. आयपीएलमध्ये एखाद्या संघाच्या कर्णधाराने त्याच्या वाढदिवशीच विजय मिळवल्याची दुर्मीळ घटना याआधीही घडली आहे. २०११ साली सचिन तेंडुलकर मुंबई संघाचा कर्णधार असतांना अशीच घटना घडली होती. त्यामुळे आपल्या वाढदिवशीच आयपीएल सामना जिंकणारा रिषभ सचिननंतरचा दुसरा कर्णधार ठरला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. फलंदाजी करताना केवळ अंबाती रायडूचा अपवाद वगळता चेन्नईचे जवळपास सर्वच फलंदाज अपयशी ठरले. त्याने ५ चौकार आणि २ षटकार ठोकत नाबाद ५५ धावा झळकावल्या. त्याला धोनीने १८ धावांची साथ दिली. तर उथाप्पाने देखील १९ धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने २ तर आवेश खान, एन्रीच नॉर्किए आणि आर आश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या. सर्वच गोलंदाजांनी अतिशय कमी धावा देत चेन्नईला १३६ धावांवर रोखलं.
चेन्नईने दिल्लीसमोर १३७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीची फलंदाजीही चेन्नईप्रमाणे ढासळली. पण शिखरने सुरुवातीला केलेल्या ३९ धावा आणि शिमरॉन हेटमायरच्या महत्त्वाच्या वेळी केलेल्या नाबाद २८ धावांच्या जोरावर दिल्लीने सामन्यावर पकड ठेवली. शेवटच्या ३ चेंडूत २ धावांची गरज असताना फलंदाजीला आलेल्या रबाडाने चौकार लगावत दिल्लीला ३ गड्यांनी सामना जिंकून दिला.
दिल्ली संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे, तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी या आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनी सीएसकेचा बॉस’, आयपीएल २०२१ ‘कॅप्टनकुल’चा अखेरचा हंगाम असल्याच्या चर्चेवर स्टेनचे भाष्य
‘विकेट घेण्यापेक्षा तू हे कर’, विराटने चहल दिला होता ‘हा’ गुरुमंत्र